दागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फ्लॅट आदींची जोरदार खरेदी : निर्माणाधीन बांधकामांमध्येही गुंतवणूक
बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी बेळगाव बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्यादिवशी नवीन वस्तूंचा शुभारंभ केला जातो. त्यामुळे वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गृहोपयोगी वस्तू, फ्लॅट यांच्या खरेदीची धूम पाहायला मिळाली. ग्राहकांना आकर्षक सवलती दिल्याने खरेदीदारांसाठी ही एक पर्वणी ठरली. मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. परंतु, दुपारनंतर खरेदीसाठीचा उत्साह अधिक दिसून आला. दुचाकी, चार चाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात आली. वाहन खरेदीसाठी शहरातील शोरुम्समध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. वाहने वेळेत मिळावीत, यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते. त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत नागरिकांनी वाहन खरेदी केली. खरेदी केलेल्या वाहनांचे चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिर तसेच हिंडलगा येथील गणपती मंदिरासमोर पूजन करण्यात आले. त्यामुळे या मंदिरांसमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रियल इस्टेट क्षेत्रात चांगली गुंतवणूक
मागील काही दिवसांपासून थंडावलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला दिवाळीमुळे चांगली गुंतवणूक मिळाली. तयार फ्लॅटसोबतच खुले प्लॉट आणि निर्माणाधीन बांधकामांमध्ये गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल होता. दिवाळीनिमित्त खास ऑफरही ठेवण्यात आल्या होत्या. निर्माणाधीन बांधकामांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पुढील दीड-दोन वर्षात फ्लॅट मिळतील, असे सांगण्यात येत असल्याने नवीन प्रकल्पांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक झाली. दिवाळी पाडव्यादिवशी फ्लॅटचा ताबा मिळवून पूजन करण्याकडेही नागरिकांचा कल दिसून आला. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एलईडी टीव्ही, होम थिएटर, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, एसी, एअर कूलर या वस्तूंची विक्री जोमात होती. काही फायनान्स कंपन्यांनी ग्राहकांना कर्जसुविधा उपलब्ध करून दिली. याबरोबरच गृहोपयोगी वस्तूंमध्ये सोफा, फर्निचरचे साहित्य, खुर्च्या, डायनिंग टेबल यासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.
सराफी पेढ्यांवर गर्दी
दिवाळीच्या अपूर्व उत्साहामध्ये प्रामुख्याने खरेदी झाली ती सोन्याची. सर्व सराफी पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. सध्या बेळगाव शहरामध्ये शतकपूर्ती केलेली पेढी म्हणजे पोतदार ज्वेलर्स यांची पेढी. याशिवाय अलीकडे नव्यानेच तनिष्क, कॅरेट लाईन, मलाबार, कल्याण, जॉयलुक्कास, भीमा, पीएनजी, अणवेकर गोल्ड अशा सोन्याच्या विविध ब्रँडेड शोरुम्स दाखल झाल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने सर्व शोरुम्समध्ये विशेष सवलत, घडणावळीवर सूट अशा जाहिराती आधीपासूनच सुरू झाल्याने ग्राहकांनी आपल्या पसंतीच्या ठिकाणी जाऊन खरेदी केली. तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होईल. त्या निमित्ताने पाडव्याचे औचित्य साधून सोने खरेदी करण्यात आली. नवविवाहितांपैकी जावयाला सोन्याचा दागिना किंवा चांदीची वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. त्यामुळे तशी खरेदीही बऱ्यापैकी झाली. ज्यांना गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणे आवश्यक वाटले, त्यांनी सोन्याची नाणी किंवा वळे खरेदी करण्यावर भर दिला. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच चांदीच्या दालनामध्येही तितकीच गर्दी दिसून आली. चांदीच्या मूर्ती, वाट्या, फुलपात्री याबरोबरच पैंजण, अँकलेट, अंगठ्या यांची खरेदी झाली.









