खरेदीसाठी बाजारात गर्दी, बालचमू किल्ला बनविण्यात गर्क : रांगोळी, आकाश कंदीलची खरेदी जोरात
खानापूर : खानापूर शहर आणि तालुक्यात गुरुवारपासून प्रकाश पर्वाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पसरले असून शहरासह ग्रामीण भागातील बालचमू किल्ला बनवण्यात गर्क झाले असून बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. तर घराघरातून फराळांचा सुगंध पसरत आहे. त्यामुळे वातावरण पूर्णपणे उत्सवमय झाले आहे.शहरात दीपावलीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात स्टॉल लागले असून यात रांगोळी, आकाश कंदील, किल्ल्याचे मावळे, उटणे, साबण, सुवासिक तेल याची खरेदी होताना दिसून येत आहे. गुरुवारी वसुबारसपासून दीपावली उत्सवाला सुऊवात झाली. गुरुवारी एकादशीदिवशी घरोघरी गायीचे पूजन करण्यात आले. तर शुक्रवारी गुरुद्वादशी आणि त्रयोदशी एका दिवशी आल्याने धन्वंतरीचे पूजन करण्यात आले आहे. रविवारी नरक चतुर्थदशी आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान आणि आरती ओवाळण्यात येणार आहे. तर व्यापारी दुकानांमध्ये आणि घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. तर मंगळवारी प्रतिपदा असल्याने या दिवशी दीपावली पाडवा साजरा करण्यात येणार आहे. तर बुधवारी भाऊबीज असल्याने भावा बहिणीतील अतुट नात्याची ओवाळणी या दिवशी घरोघरी होणार आहे. यावर्षी दीपावलीचा पर्व सलग पाच दिवस असल्याने सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे.
सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई
खानापूर शहरातील स्टेशन रोड, बाजारपेठ तसेच इतर भागातील दुकानांना व शहरातील मंदिरांवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खानापूर शहरातील विठ्ठल मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. दीपावलीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरातील काकड आरतीलाही बरीच गर्दी होत आहे.
पावसाचा बाजारपेठेवर परिणाम
गेल्या चार दिवसांपासून हवामानात एकदम बदल झाला असून दोन दिवसापूर्वी मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. यावर्षी पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेले भातपीक पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून माळरानातील तसेच पानथळ जमिनीतील भात कापणी जोरात सुरू करण्यात आली आहे. तसेच भुईमूग काढणी सुरू आहे. पावसामुळे बाजारपेठेवरही थोडा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
बालचमूंच्या किल्ल्यांचे उद्या उद्घाटन
खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात दीपावलीच्या काळात इतिहासकालीन किल्ले बनवण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरात तसेच ग्रामीण भागातही बालचमूनी तसेच युवकांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या किल्ल्यांचे उद्घाटन रविवारी होणार आहे. गावोगावी बैलगाडी शर्यत, क्रिकेट, कब•ाr, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वत्र वातावरण आनंददायी आणि उत्साहवर्धक बनले आहे.









