सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur News: दीपावलीची सुट्टी संपत आली आहे. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने आपापल्या घरी गावाकडे आलेली मंडळी आता परतू लागली आहेत. बाळा पुन्हा ये. तब्येत सांभाळ, जपून जावा, मे महिन्यात नक्की या, आई वेळेवर औषध घे, बाबा रोज मोबाईलवर बोला अशी निरोपाची देवाण-घेवाण सुरू आहे. गावात देवळाजवळ चिंचेच्या खाली एसटी स्टॉप, वडाप फाटय़ावर असे निरोपाचे वेगवेगळे सोहळे रोज सुरू आहेत.
पण आपल्याच जवळपासचे काहीजण मात्र दीपावलीच्या सणापासून आपला मुलगा, मुलगी, नात, नातू यापैकी एक तरी आपल्याला भेटायला येईल या प्रतीक्षेत आहेत. आता दीपावली सरली तरी अजून कोणीही त्यांना भेटायला आलेले नाही. त्यांची नजर नेहमी फाटकाकडे आहे. लांबून कोणी येताना दिसला तरी, आपलं कोणीतरी आला असावं असे म्हणत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत आहेत. यांच्या मागे मुलगा, मुलगी सून, नात, नातू, जावई असा गोतावळा असूनही त्यांच्या वाटेला एक न संपणारी अशी प्रतीक्षा आली आहे. आरकेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील 55 वृद्धांची या क्षणाची अवस्था आहे.
अधिक वाचण्यासाठी- खड्ड्याची दुसरी कहाणी, कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार
या वृद्धाश्रमात दीपावलीला पहाटे गरम पाण्याने अंघोळ ओवाळणी, फराळ, रात्री करमणुकीचे कार्यक्रम असा जरूर या वृद्धांचा चांगला पाहुणचार झाला. पण शेवटी रक्ताच्या नात्यातला कोणीतरी याव, आपल्याला भेटावा या त्यांच्या अपेक्षेचा मात्र चुराडा झाला. इथले सारे वृद्ध समदुखी आहेत. सत्तर-ऐंशी पावसाळे त्यांनी अनुभवलेले आहेत. आपल्या वाटय़ाला आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यात आलेले एकटेपण निमुटपणे आपण भोगायचे आहे एवढी त्यांनी आपल्या मनाची नक्की तयारी केली आहे. पण तरीही आपलं कोण आलं नाही तर नात नातू तरी अचानक ये आज्जी.. ओ आजोबा अशी साद घालत नक्की येतील अशी आशा त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात या क्षणीही जिवंत आहे.आरकेनगर येथील मातोश्री वृद्धामात 60 हून अधिक वृद्ध आहेत. त्यातील अगदी थोडे निराधार आहेत. बाकी सर्वांचे नातेवाईक कोण? त्यांचे पत्ते, त्यांचे मोबाईल क्रमांक यांची माहिती आहे. कारण हे नातेवाईकच त्यांच्या काही कौटुंबिक अडचणीतून या वृद्धांना येथे ठेवून गेले आहेत. पहिली काही वर्ष नियमित भेट, सणासुदीला भेट देत होते. पत्र पाठवत होते. फोन करून चौकशी करायचे. आजारपण असेल तर बघायला येत होते. अर्थात हे काही वर्षापुरतेच राहिले. त्यानंतर त्यांचे येणे, जाणे हळूहळू कमी होत गेले. असे का झाले याची कारणे कदाचित प्रत्येक कुटुंब किंवा प्रत्येक वृद्धाच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत. त्यात तथ्य किती आहे? किंवा नाही हा वेगळा भाग आहे. पण या क्षणी घरच्या आठवणीच्या फेऱ्यात अडकलेले हे सारे जण वृद्धाश्रमात आहेत. त्यांच्याभोवती गतस्मृतींचा कल्लोळ आणि कल्लोळच आहे.
काही दिवसापूर्वी दीपावली झाली. अर्थात साहजिकच आपल्या घरातलं नक्की कोणतरी भेटायला येणार या आशेने ही सारी मंडळी पल्लवीत झाली. त्यांच्या मनातील भावनांचा हा गदारोळ ओळखत वृद्धाश्रमाच्या शिवाजीराव पाटोळे, शरद पाटोळे व त्यांच्या परिवाराने दीपावलीची पूर्ण तयारी केली. सामूहिक फराळ केला. ओवाळणी केली. आकाश कंदीलाच्या प्रकाशात वृद्धाश्रम उजळवून सोडला. पण एवढे सारं असलं तरीही आपल्या घरातल्या माणसाचा मायेचा शब्द किंवा त्याचं दर्शन ही बहुतेक वृद्धांची खूप अशी अपेक्षा होती. पण अशा अपेक्षातच दीपावलीचे दिवस सरून गेले आणि पुन्हा मनाच्या कोपऱ्यात कुटुंबाची आठवण जपत हे सारे वृद्ध वृद्धाश्रमात आपापल्या मनाला घट्ट करून जगत राहिले.
आपणही वृद्ध होणार आहे
वृद्धाश्रमातल्या प्रत्येक वृद्धाच्या मनातला एक कोपरा आपल्या कुटुंबीयांच्या आठवणीने झुरत असतो. बरेच जण बोलून दाखवतात तर काहीजण दाखवत नाहीत. पण आम्हाला ते जाणवते. आम्ही पाटोळ परिवार त्यांना समाधानी ठेवण्याचा आमच्या परीने प्रयत्न करत असतो. वृद्धांच्या कुटुंबीयांनी या भावना जरूर जाणून घ्याव्यात. समाजानेही या वृद्धांना भावनिक व गरजेचा असा आधार देण्यासाठी पुढे यावे. कारण वृद्धत्व प्रत्येकाच्या वाटय़ाला कधी ना कधी येणारच आहे.
अँड. शरद पाटोळे, वृद्धाश्रम चालक.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









