आजरा तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत संपत आहे
सुनील पाटील,आजरा
आजरा तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान संपत आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक होऊ घातलेल्या गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी राजकीय हालचालींना वेग आला असून गावातील गट प्रमुखांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे जातील अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करून डिसेंबरअखेर या निवडणूका घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने 13 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 31 मे 2022 ही या तारखेपर्यंतची मतदार यादी गृहीत धरून ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दि. 18 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. तर त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदार यादीचा कार्यक्रम केवळ आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे 25 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामपंचायत निवडणुकांचा धमाका उडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या 36 गावांमध्ये जोडण्या लावण्यास सुरूवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळच्या निवडणूकीत खास करून तरूण मंडळी अधिक सक्रीय झाल्याचे पहावयास मिळत आहे. लोकनियुक्त सरपंच निवड करण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने उमेदवार कोण असावा याबाबतही स्थानिक नेते मंडळींकडून चाचपणी केली जात आहे. शिवाय प्रभागनिहाय असलेले आरक्षण लक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबतही चर्चा होताना दिसत आहेत.
या सर्व ग्रामपंचायतींसाठी गत पंचवार्षिकमध्येही लोकनियुक्त सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे गतवेळचा अनुभव पाठिशी असल्याने चुका दुरूस्त करून लढाईची तयारी केली जात आहे. तर लोकनियुक्त सरपंच असल्याने अनेक तरूण नशीब अजमावू पहात आहेत. विशेष करून ज्या गावातील सरपंचपद खुले आले आहे त्या गावात सरपंचपदाच्या उमेदवारांची संख्या अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या निवडणूकीत मोठा संघर्ष पहावयास मिळणार आहे. आघाडय़ांच्या राजकारणात सरपंचपदाचा उमेदवार कोणत्या गटाला आणि कोणत्या गटाला किती सदस्य द्यायचे याबाबत चर्चा सुरू असल्या तरी अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या उमेदवारीवरून चर्चा फिस्कटूही लागल्या आहेत.
सुगीच्या आधी निवडणूक धुरळा उडण्याची शक्यता
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्यास अजून पंधरा-वीस दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकींच्या चर्चेला उधाण आले आहे. दिवाळ सण आणि शेतकरी वर्गात सुगीच्या कामाला सुरू होण्याच्यावेळीच निवडणुकांचा धुरळाही उडण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र तालुक्यातील निवडणूक होऊ घातलेल्या 36 गावांमध्ये मात्र राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.