वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशनच्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज दिव्यांश, विजयवीर, सिफ्त, अनंत जीत आणि गनेमत यांनी शानदार विजय नोंदविले.
भोपाळच्या राज्यस्तरीय शूटिंग अकादमीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय रायफल आणि पिस्तूल निवड चाचणी स्पर्धेत त्याचप्रमाणे नवी दिल्लीतील डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अनंतजित सिंग नेरुका तसेच गनेमत शेखॉन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या स्कीट नेमबाजीचे विजेतेपद पटकाविले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांश सिंग पनवारने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत 636.3 गुणांसह पहिले स्थान मिळविले. मात्र, बाकू येथे होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी पनवारला नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या भारतीय नेमबाज संघामध्ये स्थान मिळू शकले नाही.

महिलांच्या टी-4 50 मी. रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात पंजाबच्या सिफ्तकौर सामराने कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताची ऑलिम्पिक नेमबाज अंजू मोदगिलने तेजस्विनी सावंतचा 16-4 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. तेजस्विनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू विजयवीर सिद्धूने आदर्शसिंगचा 30-24 असा पराभव करत पंजाबला आणखी एक पदक मिळवून दिले. या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या विजयकुमारला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
कनिष्ठांच्या विभागात पश्चिम बंगालच्या अभिनव शॉने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत तसेच महिलांच्या 3-पी ज्युनियर विभागात हरियाणाच्या निकिता कुंडूने, त्याचप्रमाणे कनिष्ठ पुरुषांच्या 25 मी. नेमबाजीत राजकुंवरसिंग संधूने पदके मिळविली. पुरुषांच्या स्कीट नेमबाजी प्रकारात राजस्थानच्या अनंतजितसिंग नेरुकाने सुवर्णपदक घेतले. या क्रीडा प्रकारात पंजाबच्या गुरुज्योतसिंगने रौप्य तर भारताचा ऑलिम्पिक नेमबाज अंगद बाजवाने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या स्कीट नेमबाजीत गनेमतने रौप्यपदक तर परिनाझ धालिवालने सुवर्णपदक घेतले.









