पणजीत 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजन : 21 अॅम्बेसिडर व्यक्तींची निवड : मंत्री फळदेसाई
पणजी : गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्याद्वारे भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि युनायटेड नेशन्स इंडिया यांच्या सहकार्याने 9 ते 12 ऑक्टोबर 2025 या दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्त गोवा 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. या पर्पल फेस्तानिमित्त पर्पल अॅम्बेसिडरची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
पर्वरी येथील विधानसभा संकुलात काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला केंद्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर, गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव प्रसन्ना आचार्य, संचालिका श्रीमती वर्षा नाईक, सचिव ताहा हाझिक, उपसंचालक डॉ. मृसेल्डा मोंतेरो आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ताच्या राजदूत निवडीसाठी नामांकन समितीचे सदस्य प्रकाश कामत आणि एनसीईपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राजदूतांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, या महोत्सवासाठी 21 पर्पल अॅम्बेसिडरची केलेली नियुक्ती ही सर्वसमावेशक विकास आणि समान संधी उपलब्ध करण्यासाठी करण्यात आली आहे.
राजेश अग्रवाल, तसेच भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनी सांगितले की, पर्पल फेस्त सर्वांसाठी समानता, समावेशकता आणि प्रतिष्ठा वाढवण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक ध्येयाशी सुसंगत आहे. महिला आणि ग्रामीण समाजाचे प्रतिनिधित्व असलेल्या या असाधारण उपक्रमास संयुक्त राष्ट्रसंघ अभिमानपूरक पाठिंबा देत आहे. आयुक्त गुऊप्रसाद पावसकर म्हणाले की, ‘पर्पल अॅम्बेसेडर’ हे या महोत्सवाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध अनुभव, सहानुभूती आणि नेतृत्वक्षमता जगासमोर आणली जात आहे. त्यांचा विचार, त्यांचे मत हे केवळ या उपक्रमाचेच नाही तर एकूणच भारतातील व्यापक समावेशकतेच्या चळवळीला आकार देणारे ठरेल. प्रवेशसुलभता, समावेशकता आणि अधिकाराधारित सक्षमीकरणाबाबत देशाचे नेतृत्व करण्याबाबत गोवा राज्याची भूमिका प्रदर्शित करणाऱ्या गोव्यातील स्थानिक प्रतिनिधित्वाचा आम्हाला विशेष अभिमान आहे. यावर्षी वेगवेगळ्या दिव्यंगत्वाचे प्रतिनिधित्व करणारे 21 प्रतिनिधी पर्पल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
पर्पल अॅम्बेसेडर व्यक्तींवरील जबाबदारी
- प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर दिव्यांग समाजाचे प्रतिनिधित्व करणे.
- महोत्सवाच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रत्यक्ष उपक्रम आणि ऑनलाईन उपक्रमांमध्ये सहभागी होणे.
- महोत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवित समावेशक संवादांमध्ये योगदान देणे
- महोत्सवाची प्रवेशसुलभता आणि समावेशकता वाढविण्यासाठी सूचना-शिफारशी करणे.
- महोत्सवाच्या आयोजनानंतरही आपापल्या प्रदेशांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी वकालत, पुरस्कार करणे.









