पतीच्या कृत्यावर पत्नीला संताप अनावर
पती-पत्नीमधील भांडण विकोपास जाऊन कधीकधी घटस्फोटाची स्थिती ओढवत असते. घटस्फोट घेण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु कधीच एखाद्या पाळीव प्राण्यामुळे दांपत्याने घटस्फोट घेतल्याचे ऐकले आहे का? एक महिला स्वतःच्या पतीला अत्यंत विचित्र कारणासाठी घटस्फोट देणार आहे. पतीने पाळीव मांजराला घरातून हाकलल्याने पत्नी घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे.
संबंधित महिलेने वडिलांच्या मृत्युनंतर बेंजी नावाचे मांजर पाळले होते, या मांजराला ती वडिलांचा पुनर्जन्म देखील मानत होती. या मांजरावर तिचे प्रचंड प्रेम होते. परंतु पतीने या मांजराला घरातून बाहेर काढल्याने ही महिला आता घटस्फोट घेऊ पाहत आहे.

महिलेने स्वतची ओळख जाहीर न करता सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. लहान पिल्लू असल्यापासून बेंजीला मी पाळत होते. बेंजी म्हणजे माझ्या वडिलांचा पुनर्जन्म असल्याचा माझा विश्वास आहे. या मांजराच्या डोळय़ांमध्ये पाहिल्यावर मला वडिलांकडे पाहत असल्याची अनुभूती होत असल्याचे या महिलेने म्हटले आहे.
माझ्या पतीला मांजरावरील माझे प्रेम अजब अन् अनारोग्यी वाटते. मांजरासोबतचे माझे नाते पतीला घाबरविते. परंतु मांजरामध्ये माझ्या वडिलांचा आत्मा असल्याचा मला विश्वास आहे. मी माझ्या आई आणि बहिणीसोबत सुटीवरून परतल्यावर पतीने बेंजीला दुसऱयाकडे सोपविल्याचे सांगितले होते. संबंधित व्यक्तीला मांजर परत करण्याची सूचना केल्यावर त्याने नकार दिल्याचे या महिलेने म्हटले आहे.
मांजर परत मिळविण्यासाठी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. तर पतीने ज्या व्यक्तीला हे मांजर दिल्याचे सांगितले त्याच्या पत्नीशी संपर्क साधल्यावर तिने घरात कुठलेच मांजर नसल्याची माहिती दिली. यावर माझ्या पतीने मांजर एका शेल्टरमध्ये सोडल्याचे स्पष्टीकरण दिले. त्वरित शेल्टरमध्ये धाव घेत मांजराला शोधून काढत घरी आणल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे.









