कोल्हापूर :
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा दुसऱ्या टप्प्यात विशेष मोहीमेत विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूरने बाजी मारली आहे. कार्यालयात करण्यात येत असलेला माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, कार्यालयीन कामकाजात ठेवलेली पारदर्शकता, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत झालेली वाढ, नियमित आणि वेळेवर दिलेली नागरीकाभूमिक सेवा यासह विविध पातळीवर सरस ठरले. त्याचे फळ म्हणून 100 दिवसाच्या कार्यालय सुधारणा मोहिमेत कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाला राज्यात तिसऱ्या क्रमांकाने गौरवण्यात आले.
तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा दुसऱ्या टप्प्यात विशेष मोहीमेत नागपूर विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा नागपूर कार्यालयाने पहिला तर अमरावती कार्यालयाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून राज्यभरातील विभागीय उपसंचालक क्रीडा कार्यालयासाठी ‘100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा दुसरा टप्पा विशेष मोहीम‘ राबवली होती. या मोहिमेअंतर्गत सर्वच शासकीय कार्यालयांच्या एकुणच कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले. मुल्यमापनापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर कार्यालयाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी कार्यालयातील संपूर्ण माहिती लेखी व फोटोग्राफ स्वऊपात शासनाच्या क्रीडा विभागाकडे. मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून केतन आवळी हे निरीक्षक म्हणून कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयातील माणिक पाटील व अन्य क्रीडा अधिकारी यांच्याकडून दैनंदिन कार्यालयीन कामकाजाची माहिती जाणून घेतली. कार्यालयातील कागदपत्रांची पाहणीही केली होती. तसेच कार्यालयीन स्वच्छता, कार्यालयालगतच्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील सोयी–सुविधाही पाहणी केली.
दरम्यानच्या काळात राज्यभरातील विभागीय उपसंचालक क्रीडा कार्यालयामधील माहितीही शासनाच्या संबंधीत विभागाकडे दाखल झाली होती. विभागाच्या पूर्वनियोजित असलेल्या सर्व निकषांमध्ये विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर कार्यालय सरस ठरले. आणि त्याचे फळ म्हणून कार्यालयाला 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा दुसऱ्या टप्प्यात विशेष मोहीमेत राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले.
- श्रेय स्टाफ, खेळाडूंना दिलेच पाहिजे…
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर कार्यालय आहे. या कार्यालयात 1 तालुका क्रीडा अधिकारी, 1 क्रीडा अधिकारी, एक अधिक्षक, 1 मुख्य लिपीक, 1 वरिष्ठ लिपीक, 1 कनिष्ट लिपीक व 1 शिपाई असा स्टाफ कार्यरत आहेत. या सर्वांनी दैनंदिन कामात अपटेड राहताना ज्या त्या दिवशी काम पूर्ण करण्यावर भर दिला. कामात शासनाला अपेक्षीत सुधारणा केल्या. क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांनीही क्रीडा संकुलात कचरा करण्यासह अन्य गोष्टी टाळल्या. या सगळ्यामुळे 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीमेत विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. याचे श्रेय सर्व स्टाफबरोबर खेळाडू, प्रशिक्षक यांना दिलेच पाहिजे.
माणिक पाटील, विभागीय उपसंचालक : क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कार्यालय








