कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या चार दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल. सर्किट बेंचसाठी 5 न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे. सिपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या आवारातील फॅमिली कोर्टच्या इमारतीमध्ये डिवीजन बेंचचे काम (2 न्यायमूर्तीं) चालणार आहे. तर मुख्य इमारतीमध्ये (आरसीसी) प्रत्येकी 1 न्यायमूर्तींचे चार कोर्टरुम तयार केल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच मंजूर केल्याची घोषणा शुक्रवारी (1 ऑगस्ट) राजपत्राद्वारे केली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे काम कोल्हापुरात सोमवार (18 ऑगस्ट) पासून नियमित सुरु होणार आहे. सर्किट बेंचचे काम कसे चालणार याबाबत उत्सुकता होती. 2 न्यायमूर्तींचे एक डिवीजन बेंच तसेच 1 न्यायमूर्तींचे 3 बेंच आहेत. मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरसह सहाजिह्यातील असणारे सुमारे 80 हजार खटले सर्किट बेंचकडे वर्ग होणार आहेत. यामुळे सहा जिह्यातील वकील आणि पक्षकारांना स्वस्त आणि जलद गतीने न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
- राधाबाई इमारतीमध्ये कॉन्फरन्स रुम
राधाबाई इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर न्यायमूर्तींसाठीच्या कॉन्फरन्स रुमची व्यवस्था केली आहे. तळमजल्यावर लिपीक आणि रजिस्टार यांच्यासाठी स्वतंत्र दालने तयार केली आहेत. याचसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स रुमचीही व्यवस्था केली आहे.
- फॅमिली कोर्ट इमारतीमध्ये डिविजन बेंच
जुन्या न्यायालयाच्या काळामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कामकाज ज्या ठिकाणी सुरु होते, त्याच ठिकाणी न्यायालय कसबा बावडा येथे स्थलांतरित झाल्यानंतर फॅमिली कोर्ट सुरु केले. याच हेरिटेज इमारतीमध्ये डिवीजन बेंच बसणार आहे. यामध्ये रिट याचिका, एफआयआर रद्द करण्याच्या याचिका, जनहित याचिका यांचे कामकाज चालणार आहे.
- आरसीसी इमारतीमध्ये 4 न्यायदालने
जुन्या न्यायालयाच्या आरसीसी इमारतीमध्ये चार न्यायदालने असतील. या ठिकाणी प्रत्येक 1 न्यायमूर्ती न्यायदानाचे काम करणार. तसेच या रुममध्येही व्हिडिओ कॉन्फरन्सची व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर चौकशी कक्ष आहे. तर याच इमारतीच्या बाजूच्या खोलीत ऑनलाईन नोंदणी कक्ष ठेवला आहे.
- जुन्या ग्रंथालयात सरकारी वकील
न्यायालयातील जुने ग्रंथालय तसेच वकिलांसाठीच्या कँटीनच्या इमारतीमध्ये सरकारी वकिलांसाठी चेंबर केले आहेत. तळमजल्यावरील काही भागात हे चेंबर्स आहेत. तर उर्वरित भागामध्ये अधिकाऱ्यांसाठी वेटिंग रुम केली आहे. एखाद्या सुनावणीसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त किंवा इतर उच्चपदस्थ अधिकारी आल्यास त्यांच्यासाठी प्रतिक्षा कक्ष केले. याच्या पहिल्या मजल्यावर रेकॉर्डरुमचे नियोजन केले आहे.
- दोन दिवसांत पाहणी
सर्किट बेंचचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 10 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या आहेत. याची पाहणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींकडून येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. तसेच कामकाजाचा आढावा घेऊन मगच उद्घाटनाची तारीख ठरविण्यात येणार आहे.
- 8 ऑगस्टपर्यंत खटल्यांची कागदे कोल्हापुरात
सहा जिह्यातील जवळपास 80 हजार खटले मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत. याची यादी उच्च न्यायालय प्रशासनाकडून तयार केली. पुढील अडीच महिन्यात कोणकोणत्या खटल्यांच्या तारखा आहेत. ह पाहण्यात येणार आहेत. या खटल्यांची सर्व कागदपत्रे 8 ऑगस्टपर्यंत कोल्हापुरात येणार आहेत.








