मनुष्य त्याच्या प्रिय व्यक्तीला सर्वस्व अर्पण करतो कारण त्याला त्या व्यक्तीबद्दल आपलेपणा वाटत असतो. बाप्पा म्हणतात, तसाच आपलेपणा माझ्याबद्दल जप आणि तू जे जे काही करशील ते ते मला अर्पण कर. असं करत गेल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय होशील व मी तुला परमपद बहाल करीन. ही संधी मी समाजातील सर्व व्यक्तींना देत असतो. कुणीही निरपेक्षतेनं माझी भक्ती करावी, मला आपलं म्हणावं आणि सरते शेवटी माझ्यात मिसळून जावं असं मला मनापासून वाटतं कारण तुम्ही सर्व माझे आहात. माझे अंश आहात. माझे अंश असल्याने तुम्ही सर्व माझ्या विभूतीच आहात. तुम्हा सर्वांच्यातही माझ्याएव्हढं सामर्थ्य येऊ शकतं परंतु तुम्ही सर्व मायेने वेढले गेलेले असल्याने तुम्हाला तुमच्यातील सुप्त सामर्थ्याची कल्पना येत नाही. माझ्या सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून सांगतो की, सर्व ब्रह्मांड मीच व्यापलंय पण सामान्य माणसं तर राहुदेतच पण देव आणि ऋषी सुद्धा हे जाणत नाहीत असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
न विनश्यति मद्भक्तो ज्ञात्वेमा मद्विभूतयऽ । प्रभवं मे विभूतिश्च न देवा ऋषयो विदुऽ ।। 23 ।।
अर्थ- माझ्या विभूती जाणणारा माझा भक्त नाश पावत नाही. देव अथवा ऋषि माझी उत्पत्ती आणि विभूती जाणत नाहीत.
नानाविभूतिभिरहं व्याप्य विश्वं प्रतिष्ठितऽ ।
यद्यच्छ्रेष्ठतमं लोके स विभूतिर्निबोध मे ।। 24 ।।
अर्थ- नानाप्रकारच्या विभूतींनी विश्व व्यापून मी स्थित आहे. जगामध्ये जें जें अत्यंत श्रेष्ठ ते ते माझी विभूती आहे असे जाण.
विवरण- विभूती म्हणजे अशी स्थानं जिथं ईश्वराचं ऐश्वर्य, शोभा, प्रभाव, महात्म्य, तेज ठळकपणे जाणवतं. अशी स्थानं बघितली की, आपली नजर ईश्वराकडे जाऊन आपण नतमस्तक होतो. आपल्या लगेच लक्षात येतं की, हे सामान्य माणसाचं काम नसून विशेष सामर्थ्य असलेली व्यक्तीच हे करू शकते आणि हे सामर्थ्य ईश्वरीय असल्याने, ईश्वराप्रमाणेच कधीही नष्ट होणार नाही. माणसाला स्वत:च्याच सुप्त सामर्थ्याची कल्पना नसते तर त्याला ईश्वराच्या सामर्थ्याची कल्पना कुठून येणार? त्यातून हे सामर्थ्य एव्हढे प्रचंड आहे की, मोठमोठे ऋषीमुनी, प्रमुख देवता यांनाही याची कल्पना येऊ शकत नाही. कारण ते स्वत:ला कर्ता समजत असल्याने माझे सामर्थ्य समजून घेण्याची कुवतच त्यांच्यात नसते. हेही तेव्हढंच खरं आहे की, जो माझ्या विभूती जाणतो त्याला तो स्वत:ही माझीच विभूती आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार निरपेक्ष वर्तन करून जगात वावरतो. त्यामुळे त्याचा कधीही नाश होत नाही.
असे संत सज्जन, साधुपुरुष, सद्गुरु त्यांच्या अवतारकार्याच्या समाप्तीनंतरही त्यांना शरण आलेल्या भक्तांना अभय देऊन त्यांचं संरक्षण करतात व त्यांना मोक्षमार्गावर चालायला प्रवृत्त करतात. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दहाव्या अध्यायात त्यांच्या विभूती कुठं कुठं आहेत ते सविस्तर सांगितलंय आणि शेवटी ते म्हणतात, जगात जे जे काही श्रेष्ठ आहे ते ते माझी विभूती आहे असे समज. अर्जुना, अरे या विभूतीतही माझ्यासारखं प्रचंड सामर्थ्य जरी असलं तरी त्याही माझ्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाहीस. माझ्या सामर्थ्याची चुणूक म्हणून तुला सांगतो की, हे सर्व ब्रह्मांड मीच व्यापलंय आणि माझ्याशिवाय इथं दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाहीये रे! यासाठी माझ्या सामर्थ्याचा एक छोटासा अंशही पुष्कळ होतो.
माझ्या विण नसे काही लेश-मात्र चराचरी । एकांशे विश्व हे सारे व्यापूनि उरलो चि मी ।
या संपूर्ण अध्यायामध्ये ईश्वराची उपासना कशी करावी त्याचे बाप्पांनी मार्गदर्शन केले व शेवटी ईश्वरी सामर्थ्य काय आणि किती असते तसेच ते कुठे पहावे हेही सांगितले.
श्रीगणेशगीता सातवा अध्याय समाप्त








