जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी : नळजोडणी करून स्वच्छ पाणीपुरवठा करा
बेळगाव : जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी तालुक्मयातील हलगा व बस्तवाड ग्राम पंचायतींना भेट देऊन जलजीवन मिशन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तसेच त्यांनी स्थानिक लाभार्थ्यांशी नळजोडणीबद्दल चर्चा करून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत ग्रा. पं. अध्यक्ष व सदस्यांशी चर्चा केली. राहुल शिंदे यांनी हलगा येथे भेट देऊन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावांमध्ये सुरू असलेली प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
कोंडसकोपला भेट : कामाची पाहणी
यानंतर कोंडसकोप गावाला भेट देऊन येथे पीडीओंकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर अंगणवाडी केंद्राला भेट दिली. साहाय्यक अभियंता यांना बोलावून कोंडसकोपचा बहुग्राम पेयजल प्रकल्पात समावेश करून घेण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार, ईई किरण घोरपडे, एईई एस. एफ. शिवापूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









