राज्य निवडणूक आयुक्तांचे सूतोवाच
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायतच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जी. एस. संगरेशी यांनी बुधवारी बेळगाव येथे दिली. यासाठी तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात होता. आता तो रद्द झाला. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. 31 मे पर्यंत आरक्षणाची यादी उच्च न्यायालयात देण्याचे सरकारने मान्य केले आहे. त्यानंतर निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीत निश्चित तारीख सांगता येणार नसली तरी लवकरच जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरीस राज्यातील ग्रामपंचायतींची मुदत संपते. त्यानंतर ग्राम पंचायत निवडणुकाही घ्याव्या लागणार आहेत. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकीच्या आधी दावणगेरे, शिमोगा, तुमकूर, मंगळूर, म्हैसूर महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सरकार आरक्षण ठरवणार आहे. त्यानंतर निवडणुका घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.









