बैंलहोंगल, सौंदत्ती तालुक्यातील कामांची पाहणी : अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी बैंलहोंगल व सौंदत्ती तालुक्यातील गावांना भेटी देऊन जलजीवन मिशन व विविध कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच नागरिकांशी चर्चा करून पाणीपुरवठा योग्यरित्या होत आहे की नाही, याचीही माहिती घेतली. स्वच्छता व पाणी याला अधिक महत्त्व देण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
प्रारंभी राहुल शिंदे यांनी बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी ग्रा. पं. तीला भेट देऊन जलजीवन मिशन प्रकल्पाची पाणी करून ओएचटी (ओव्हर हेड टँक) च्या स्वच्छता आणि साफसफाईची तारीख लिहिण्याची सूचना दिली. यानंतर पदवीपूर्व महाविद्यालयाला भेट देऊन कामांची पाहणी केली. बैलहोंगल येथे ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या राणी चन्नम्मा महिला शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन महिलांशी संवाद साधला.
सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
1000 महिलांकडून 1500 रुपये संग्रह करून कंपनीसाठी 15 लाख रुपयांचे भांडवल गोळा केले आहे. 2013 मध्ये कंपनीची नोंदणी करण्यात आली असून, एफडीव्हीआरसीकडून इक्विटी मिळविली आहे. खत, रसायन व बियाणे व्यवसाय परवाना मिळाला असून, लघू उद्योग सुरू केला आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात 125 स्प्रे पंप व ताडपत्री विक्री केल्याचे महिलांनी सांगितले. कृषी विभागाकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
मल्लापूर ग्रामपंचायतीला भेट : अहवाल देण्याची सूचना
यानंतर मल्लापूर ग्रा. पं. तीला भेट देऊन नळजोडणी केंद्राची पाहणी करून चर्चा केली. त्यानंतर वन्नूर ग्रा. पं. भेट देऊन ग्रामसेवक व नागरिकांशी चर्चा करून आंबेडकर वसती शाळेला भेट देत मूलभूत सुविधांची पाहणी केली. सौंदत्ती तालुक्यातील हिरेबूदनूरला भेट देऊन नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा व रस्त्याच्या पुनर्बांधणीबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याची सूचना केली.
चचडी येथे नळजोडणीची तसेच शाळेतील जेवणाच्या खोलीची पाहणी केली. इंचलला भेट देऊन पिण्याचे पाणी योजनेची पाहणी करून विविध कामांचे निरीक्षण केले. यानंतर मुतवड, हारुगोप्प ग्रा. पं. तीलाही भेट दिली.
यावेळी कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, बसवराज अयानगौडर, महेश हुलीमनी, सौंदत्तीचे कार्यकारी अधिकारी आनंद बडकुंद्री यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









