कोल्हापूर :
डॉक्टर महिला व तिच्या पती विरोधातील माहिती अधिकारातील अर्ज मागे घेण्यासाठी 15 लाखांची खंडणी स्विकारणाऱ्या माहिती अधिकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. जयराम भिमराव कोळी (वय 43 रा. नेहरूनगर), युवराज मारूती खराडे (वय 45 रा. उचगांव ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख 30 हजार, एक चार चाकी वाहन, तीन मोबाईल असा सुमारे 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कागल येथील लक्ष्मी टेकडी नजीक ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा येथील अजिंक्य अनिल पाटील यांचा वैद्यकीय उपकरणे बनविण्याचा व्यवसाय आहे. तसेच सीपीआर रुग्णालयाचे ते वैद्यकीय उपकरण पुरवठादार आहेत. पाटील यांची पत्नी डॉक्टर असून 2024 ते मार्च 2025 या काळात त्या सीपीआर रुग्णालयात कार्यरत होत्या. याकाळात कोल्हापूर नेहरूनगर येथील जयराज भिमराव कोळी यांनी या दोघांच्या विरोधात वारंवार तक्रार अर्ज दाखल केले. हे तक्रार अर्ज मागे घेऊन त्रास देण्याचे थांबविण्यासाठी कोळी यांचा मित्र युवराज मारूती खराडे यांनी पाटील दांपत्याकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मागणी केलेली रक्कम न दिल्यास राज्यात अन्यत्र कोठेही काम करू देणार नाही. अशी धमकीही पाटील यांना दिली होती.
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पाटील दांपत्याने तडजोड करून खराडे यांना 15 लाख रुपये देण्याचे कबूल केले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे कोळी आणि खराडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळील एमआयडीसीत जाणाऱ्या रोडवरील पेट्रोल पंपावर पोलिसांनी सापळा रचून जयराम कोळी आणि युवराज खराडे यांना अटक केली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजाता पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान या दोघांना मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संतोष बरगे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, यांनी ही कारवाई केली.
- 15 लाखांत 30 हजारांच्या खऱ्या नोटा
जयराज कोळी व युवराज खराडे यांना देण्यात येणाऱ्या 15 लाख रुपयांच्या रकमेत 30 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा वापरण्यात आल्या होत्या. 500 रुपयांची 30 बंडले करण्यात आली होती. या बंडलांमध्ये वरती व खालच्या बाजूस खऱ्या नोटा वापरण्यात आल्या होत्या. तर बंडलाच्या मध्यभागी खेळण्यातील बनावट नोटांचा वापर करण्यात आला होता.
- प्रहार संघटनेतून डच्चू
जयराज कोळी हा काही वर्षापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा कोल्हापूरातील पदाधिकारी होता. यावेळीही त्याने संघटनेच्या नावावर अशा प्रकारे अनेक उद्योग केले होते. याची माहिती संघटनेतील वरिष्ठांना कळाल्यानंतर त्याची प्रहार संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
- शेकडो कार्यालयात हजारो अर्ज
प्रहार संघटनेतून डच्चू मिळाल्यानंतर जयराज कोळी हा माहिती अधिकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. याच संघटनेच्या नावाने तो विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत होता. गेल्या दोन वर्षात त्याने विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात हजारो माहिती अधिकाराचे अर्ज केले होते. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनाही अशाच प्रकारे वारंवार असेच त्रास दिल्याचे प्रकार समोर आले आहेत.
- दोन वेळा लोकेशन बदलले
जयराज कोळी व युवराज खराडे यांनी सोमवारी सायंकाळी अजिंक्य पाटील यांना खंडणीचे पैसे घेवून कागल येथे येण्यास सांगितले. मात्र काही वेळातच फोन करुन कागल पंचतारांकीत एमआयडीसी येथील लक्ष्मी टेकडी जवळ बोलविले.
- खंडणीखोरांविरोधात निर्भयपणे तक्रार द्या
जिह्यात व्यावसायीक, सरकारी अधिकारी यांच्याकडे कोणीही खंडणी मागत असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलीस दलाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. फाळकुट दादा किंवा अन्य कोणीही खंडणीची मागणी केल्यास नागरीक, व्यावसायीकांनी निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले.








