64 तक्रारदारांनी मांडले गाऱ्हाणे :
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या फोन ईन कार्यक्रमाला शनिवारी उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव शहर व उपनगरातूनच 24 हून अधिक जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनाही फोन ईन कार्यक्रम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत जिल्हा पोलीसप्रमुखांबरोबरच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणुगोपाल यांनीही फोन ईन कार्यक्रमात भाग घेतला. शनिवारी झालेल्या 16 व्या कार्यक्रमात बेळगाव शहर व जिल्ह्यातूनच नव्हे तर बळ्ळारी जिल्ह्यातूनही दोघा जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडले.
बेकायदा दारूविक्री, मंदिरातील दानपेटीची चोरी, चोऱ्या प्रकरणांचा तपास, वाहतुकीची समस्या, खासगी सावकारी आर्थिक फसवणूक प्रकरणे, गावठी दारूविक्री आदींविषयी कागवाड, अथणी, रामदुर्ग, हारुगेरी, रायबाग, चिकोडी, खानापूर, घटप्रभा, उगार बुद्रुक, बेडकीहाळ, बरगाव, सौंदत्ती, चमकेरी आदी जिल्ह्यातील विविध भागांतून 64 जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून तक्रारी मांडल्या.
बेळगावातील कॅम्प, पारिजात कॉलनी, टिळकवाडी, महाद्वार रोड, इनाम बडस, हलगा, कोनवाळ गल्ली, शहापूर, भांदूर गल्ली, मच्छे, अलतगा, खादरवाडी, वडगाव, रामलिंग खिंड गल्ली, नाथ पै सर्कल परिसरातील 24 जणांनी शहरातील समस्या मांडल्या. टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविणे, अशास्त्राrय स्पीडब्रेकर हटविणे, आर्थिक फसवणूक, कौटुंबिक कलह, ऑटोरिक्षांना मीटर बसविणे, बेकायदा दारूविक्री आदींबरोबरच वाहतूक समस्यांविषयीही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. चोरनुर, जि. बळ्ळारी येथील दोघा जणांनी पोलीस स्थानकातील गैरवर्तणुकीबद्दल तक्रारी केल्या.
आजवर 971 जणांच्या तक्रारी
जिल्हा पोलीसप्रमुखांनी शनिवारी राबविलेला 16 वा फोन ईन कार्यक्रम होता. एकूण 64 जणांनी आपले गाऱ्हाणे मांडले. यामध्ये 24 जण बेळगाव शहरातील होते. आतापर्यंत 971 जणांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. शहरातील तक्रारीही वाढल्यामुळे पोलीस आयुक्तांनीही फोन ईन कार्यक्रम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, उपायुक्त शेखर एच. टी. यांनीही लवकरच फोन ईन कार्यक्रम सुरू करण्याची ग्वाही दिली होती.









