आझमनगर-शिवबसवनगर येथे केली पाहणी
बेळगाव : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी आझमनगर व शिवबसवनगर येथील विद्यार्थी वसतिगृहांना अचानक भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याण खात्याकडून हे वसतीगृह चालवले जाते. राहुल शिंदे यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघर, शौचालयांसह विद्यार्थ्यांच्या वास्तव्यासाठी असणाऱ्या खोल्यांचीही पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत का? याची माहिती घेतली. पिण्याचे शुद्ध पाणी व इतर सुविधांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.
आझमनगर येथील ग्रंथालय लहान आहे. त्यामुळे मुलांच्या अभ्यासासाठी अननुकूल होत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने ग्रंथालयाचा विस्तार वाढविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा नियमानुसार उपलब्ध करून द्याव्यात, असे अधिकाऱ्यांना सूचित करतानाच त्यांनी जेवणाची गुणवत्ताही तपासली. वसतिगृहात आश्रय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिस्त व जबाबदारीचे पालन करावे. यामुळे उत्तम भविष्य निर्माण करून घेण्यास मदतीचे ठरते, असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अनुसूचित वर्ग कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली व वसतिगृहाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.









