इदलहोंड, लोंढ्यातील पूरस्थितीची घेतली माहिती : अधिकाऱ्यांना विविध सूचना
बेळगाव : जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी खानापूर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पाऊस व पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर तेथील समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तालुक्यातील इदलहोंड ग्रा. पं. व्याप्तीतील सरकारी उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेतील मूलभूत सुविधा, शिक्षक व मुलांची हजेरी याबाबत माहिती घेतली. यानंतर खानापूर-गोवा रस्त्यावरील हालात्री ओढ्याचा प्रवाह व पुलाची पाहणी करून सद्यस्थितीबाबत ग्रा. पं. व महापालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
तसेच नदी पुलाजवळील पाण्यात झाडांच्या पडलेल्या फांद्या साफ करून घेण्याची सूचना वन अधिकाऱ्यांना केल्या. लोंढा ग्रा. पं. कार्यालयाला भेट देऊन विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पांढरी नदीला येणाऱ्या पुरामुळे गांधीनगर पाण्याखाली जाते. यामुळे येथील नागरिक प्रभावित होऊन त्यांचे स्थलांतर करावे लागते. या पार्श्वभूमीवर त्यांनी रहिवाशांबरोबर चर्चा करून पूरस्थितीची माहिती घेतली. पूरस्थिती रोखण्याबाबत व उपाययोजनांबद्दल माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. तसेच उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन इमारत व मुलांच्या हजेरीची पाहणी केली.
वीजपुरवठा खंडित झाल्याने मुलांना समस्या निर्माण होतात. यामुळे शाळेतील सर्व वर्गखोल्यांमध्ये चार्जिंग बल्प किंवा सोलार बसविण्याची सूचना पीडीओंना दिली. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि. पं. मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, शिक्षण खात्याचे उपसंचालक लीलावती हिरेमठ, अक्षर दासोह जिल्हा शिक्षणाधिकारी एल. व्ही. यकुंडी, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री, तहसीलदार दुंडप्पा कोमार, पंचायतराज खात्याचे अभियंता राजेंद्र जाधव, बीईओ रामप्पा, रुपाली, बडकुंद्री, विजय कोतीन यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









