बेळगाव : कित्तूर तालुक्यातील बैलूर व देवराशिगिहळ्ळी ग्राम पंचायतींना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी मंगळवारी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. देवराशिगिहळ्ळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील क्यारकोप्प गावात जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली. जिल्ह्यात चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे जिह्यातील पहिले गाव म्हणून ओळखले जाणारे क्यारकोप्प गाव असून ग्रामस्थांची मागणी, पाणी पुरवठ्याचे प्रमाण आणि पाण्याचे बिल याची माहिती घेतली. सर्वांना मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय करू नका, असे आवाहन केले.
त्यानंतर बैलूर ग्राम पंचायतीला भेट दिली. कर्जवसुली, ई-मालमत्तेचे वितरण याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा. पात्र व्यक्तींना शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना केल्या. गावातील पाळणा घर व डिजिटल लायब्ररीला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणि स्टेशनरीसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे अधिकाऱ्यांना सूचविले. रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मुलांना ठरवून दिलेल्या मेन्यूनुसार पोषण आहार द्यावा. स्वच्छता राखण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
तसेच रोहयो योजनेंतर्गत अधिकाधिक मनुष्य दिवस निर्माण करून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावेत. यापूर्वी सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार वैयक्तिक व सामुदायिक कामे सुरू करावीत, मजुरांना कामे देण्यास विलंब होता कामा नये, अशीही सूचना केली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, ता. पं. कार्यकारी अधिकारी किरण घोरपडे, पंचायतराज विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता महेश हुली, साहाय्यक संचालक मोहम्मद गौस रिसालदार, सुरेश नागोजी, तांत्रिक समन्वयक विनयकुमार पाटील, पीडीओ ईश्वर हडपद, विनयकुमार कोरवी यांसह ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.









