प्रतिनिधी,कोल्हापूर
पन्हाळा तालुक्यात राज्यातील पहिलाच उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग सन 2018 ला यशस्वी ठरल्यानंतर आता दरवर्षीच उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून 23 एकरांवर बिजोत्पादनासाठी उन्हाळी नाचणीची लागवड झाली असून यातील काही नाचणी प्रक्षेत्रांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच पाहणी केली. शेतकऱ्यांनी नाचणी उत्पादनाबरोबरच प्रक्रिया करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून राहूल रेखावार यांनी पाटपन्हाळा आणि काळजवडे येथील गणपती संभाजी पाटील आणि प्रकाश पाटील या नाचणी उत्पादकांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. कृषी विभागाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत लाभार्थी विजय पाटील पोहाळे यांच्या प्रक्रिया केंद्रासही त्यांनी भेट दिली.
आर्थिक आवक वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याने रेशीम लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेऊन लागवड करावी व आर्थिक उन्नती साधावी असेही त्यांनी सांगितले. महाबीजच्या माध्यमातून विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्याचे आवाहन रेखावार यांनी केले. खरीप हंगामात वाढत चाललेल्या नाचणीच्या पेरा आणि त्या अनुषंगाने बियाणाची आवश्यकता ध्यानात घेऊन आत्मा विभाग, महाबीज, विभागीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने या भागात गेल्या पाच वर्षांपासून नाचणीचे उन्हाळी हंगामात उत्पादन घेतले जात आहे.
पश्चिम भागातील एकूण 38 शेतकऱ्यांनी 23 एकर क्षेत्रावर उन्हाळी नाचणी व 2 एकर क्षेत्रावर वरी पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामातील नाचणीची उत्पादकता 8 ते 10 क्विंटल प्रती एकर इतकी असून आत्मा अंतर्गत पीक प्रात्यक्षिक बाबीमधून सन 2018 पासून उन्हाळी हंगामातील नाचणीची उत्पादकता सरासरी प्रती एकरी 16-18 क्विंटल इतकी मिळाली आहे.
पन्हाळा पश्चिम भागातील उन्हाळी नाचणी उत्पादक शेतकरी एकरी 16 ते 18 क्विंटल इतके भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पन्हाळा भागात खरीप व उन्हाळी मिळून नाचणीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादित झालेली नाचणी जलद गतीने विक्री होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती घेऊन नाचणी खरेदीसंदर्भात मार्केटिंग फेडरेशन कोल्हापूर यांना सुचना केल्या.
पन्हाळा तालुक्यात नाचणी खरेदी केंद्र सुरु झाल्यास नाचणीची लागवड वाढण्यास वाव मिळेल, असे नाचणी उत्पादकांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना सांगितले.प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी उत्पादनाच्या राज्यातल्या पहिल्या प्रयोगापाठोपाठ उन्हाळी वरी उत्पादनाच्या राज्यातला पहिल्या यशस्वी प्रयोगाबाबत आणि या प्रयोगासाठी सहकार्य केलेल्या तत्कालीन आत्मा अधिकारी, कृषि अधिकारी, शास्त्रज्ञ यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भुमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी पन्हाळा तालुका कृषि अधिकारी डी. एस शिंगे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नासीर इनामदार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस चौगुले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. ए. पाटील, कृषि क्षेत्र अधिकारी फुलसिंग आडे, कृषि सहाय्यक मधु कुंभार, प्रगतीशील शेतकरी दिलीप चौगले, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील तसेच परिसरातील नाचणी आणि वरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









