२२ मार्च रोजी सावंतवाडीत जिल्हास्तरीय साहित्य संमेलन
सावंतवाडी । प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली असून आज त्यांना या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले . या साहित्य संमेलनाला आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच आपण निश्चितपणे या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री राणे यांनी उपस्थितांना दिली . यावेळी ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के ,सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत ,उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे ,सहसचिव राजू तावडे, ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ ,जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा संचालक महेश सारंग, माजी नगरपालिका सभापती उदय नाईक आधी उपस्थित होते.
कोमसापच्या सावंतवाडी शाखेचे आयोजन असलेले हे साहित्य संमेलन संस्थानकालीन सावंतवाडीत भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे . त्यासाठी विविध समित्या गठीत केल्या जाणार आहेत.या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांची एक मताने निवड बैठकीत करण्यात आली आहे. श्री केसरकर यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आपण निश्चितपणे हे संमेलन यशस्वी करू अशी ग्वाही दिली आहे. लवकरच त्यांच्या उपस्थितीत येत्या आठ दिवसात संमेलनाच्या नियोजना संदर्भात बैठक घेतली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्था तसेच सर्व घटकांना सहभागी करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने हे साहित्य संमेलन फार महत्त्वाचे मानले जात आहे. गाव तेथे साहित्य चळवळ अशी संकल्पना या साहित्य संमेलनाची आहे. सावंतवाडीच्या नगरीत साहित्य संमेलन व्हावे अशी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची इच्छा आहे आणि त्यानुसार ते स्वतः सावंतवाडी येथील साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.









