रायबाग मतदारसंघात सर्वाधिक : नवमतदारांची संख्याही लक्षणीय
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने लगबग चालविली आहे. मतदारयाद्या अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध वयोगटातील मतदारांची संख्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 1650 मतदार शतायुषी असून नवमतदारांची संख्या 96 हजार 434 आहे. मतदारसंघ पुनर्रचना आरक्षण यामुळे जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका तब्बल चार वर्षे रखडल्या आहेत. आता मात्र काँग्रेस सरकारवर दबाव वाढला असून, निवडणुका लवकर घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मतदारयाद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये वयोगटनिहाय मतदारांची संख्या समोर आली आहे.
यामध्ये बेळगाव उत्तर मतदारसंघातील एका मतदाराने वयाची 120 वर्षे ओलांडली आहे. तर 100 ते 119 वयोगटातील मतदार संख्या 1649 इतकी आहे. 100 ते 109 वयोगटात 599 पुरुष तर 1047 महिला मतदार आहेत. 110 ते 119 वयोगटात 3 महिला मतदार असून 120 वर्षे वयोगटात एका महिला मतदार आहे. शतायुषी मतदारांमध्ये सर्वाधिक रायबाग मतदारसंघामध्ये असून 250 मतदार आहेत. त्यानंतर कुडचीमध्ये 235 शतायुषी मतदार आहेत. तर 110 ते 119 वयोगटात रायबाग 1, कित्तूर 1 तर रामदुर्ग मतदारसंघात 1 मतदार आहे. 120 वर्षे ओलांडलेला मतदार बेळगाव उत्तर मतदारसंघात आहे. तसेच 80 ते 89 वयोगटात 86 हजार 840 मतदार असून यामध्ये 38 हजार 375 पुरुष, 48 हजार 464 महिला तर 1 तृतीयपंथी मतदार आहे. त्याचबरोबर 90 ते 99 वयोगटात 18 हजार 955 मतदार असून 7 हजार 559 पुरुष तर 11 हजार 396 महिला मतदार आहेत.
85 वषर्विंरील मतदारांसाठी विविध उपक्रम
85 वर्षांवरील मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांना घरातूनच मतदान करता यावे, अशी व्यवस्था पूरविण्यात येते. यामुळे वयोवृद्ध मतदारांना सोयीचे ठरते. आता आगामी निवडणुकीदरम्यान शतायुषी मतदारांचे मतदान देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांचा सहभाग प्रत्येकासाठी प्रेरणादायी असणार आहे. जिल्ह्यात हजारो शतायुषी मतदार असून ही बाब बेळगाव जिल्ह्यासाठी विशेष आहे.
नवमतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण
आजकाल युवा मतदारांवर सर्वांच्या नजरा असतात. कारण युवापिढीच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक युवा मतदार अरभावी मतदारसंघात असून 18 ते 19 वयोगटात 7 हजार 94 मतदार आहेत. यानंतर अथणी 6 हजार 944, कुडची 6 हजार 380, रायबाग 6 हजार 325 तर चिकोडी-सदलगा मतदारसंघात 6 हजार 200 युवा मतदार आहेत. लोकशाहीच्या बळकटीसाठी नवमतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण असणार असून त्यांचा आगामी निवडणुकीदरम्यान होणार सहभाग मौल्यवान ठरणार आहे.









