सावंतवाडी । प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव प्रचंड वाढला असून तालुक्यातील शेती,बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. या हत्तीच्या कळपाने काल घोटगे गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे नुकसान केले आहे. यापूर्वी जीवीतहानी सुद्धा झालेली आहे. तरी या हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक यांच्याकडे केली. यावेळी उपवनसंरक्षक यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत उपवनसंरक्षक यांनी सांगीतले की, ओंकार हत्तीला पकडण्यासाठी शासनाकडून परवानगी प्राप्त झाली असून सध्या पाऊस असल्यामुळे ओंकार हत्तीला पकडण्यात अडचण येत असून पाऊस कमी झाल्यावर ओंकार हत्तीला पकडण्याची मोहीम तातडीने हाती घेण्यात येईल. त्याच प्रमाणे इतर हत्तीना पकडण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सद्या थर्मल ड्रोन मार्फत हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्याची सुचना त्याभागातील शेतकऱ्यांना अर्ध्या तासात देण्यात येत आहे. ही सुचना पाच मिनिटात शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यात होत असलेल्या गवारेडे आणि माकडाच्या उपद्रवाबद्दल चर्चा करून त्यांचा होणारा उपद्रव कसा कमी करता येईल यासंदर्भात उपवनसंरक्षक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. या संदर्भात वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपवनसंरक्षक यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, उपाध्यक्ष विलास गावडे, सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत,संजय लाड, बाबू गवस,बबन डिसोजा,समीर वंजारी, तौकिर शेख, शिवा गावडे, बाळासाहेब नंद्दीहळ्ळी इत्यादी उपस्थित होते.









