सुरक्षेसोबतच पर्यावरणाबाबत केली चर्चा
बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विकासासंदर्भात नुकतेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या बांधकामाबाबत सविस्तर चर्चा झाली. विमानतळ प्राधिकरणाला येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेत त्या लवकर निवारण केल्या जातील, असे आश्वासन दिले. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नवे टर्मिनल बिल्डिंग उभारले जात आहे. 322 कोटी रुपये खर्च करून 19600 चौरस मीटर टर्मिनल बिल्डिंग होत असल्याने ते चांगल्या दर्जाचे व्हावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. तसेच सुरक्षेसंदर्भात पोलीस व विमानतळ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. या जागेच्या संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. याबरोबरच विमानतळाशी संबंधित बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी विमानतळाचे संचालक त्यागराजन व इतर अधिकारी उपस्थित होते.









