बेळगाव : अनेक दिवसांपासून पेन्शनसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या वयोवृद्ध दिव्यांगासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मानवता दाखवल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. चालता न येणाऱ्या वृद्धाजवळ जाऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावत पेन्शनबाबत विचारणा करून वृद्धाला दिलासा दिला. एक दिव्यांग वृद्ध बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. पायाला दिव्यांगत्व असल्यामुळे हातांच्या आधारे तो दिव्यांग कार्यालयासमोर येऊन ठेपला. मागील अनेक दिवस प्रयत्न करूनही ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी पेन्शन त्यांना मिळत नव्हती. पाठपुरावा करूनही पेन्शन दिली जात नसल्याने त्या नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
जिल्हाधिकारी आपल्या वाहनातून बैठकीसाठी निघाले होते. परंतु, त्यांना तो दिव्यांग वृद्ध निदर्शनास पडला आणि ते वाहनातून खाली उतरले. जिल्हाधिकाऱ्यांनी वयोवृद्ध व्यक्तीची विचारपूस केली असता आपल्याला पेन्शन मिळत नसल्याचे त्याने सांगितले. त्या वृद्धाचे आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रे घेऊन ती संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. तुम्हाला चालता येत नाही, मग व्हीलचेअर का वापरत नाही? असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला. यावर आपल्याला व्हीलचेअर चालवता येत नाही. काहीही करा पण पेन्शन मिळवून द्या, अशी मागणी त्या वृद्धाने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या मानवतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









