भरपाईची मागणी : बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावा
बेळगाव : बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून,शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बळ्ळारी नाला परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करावी व अधिकाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची सूचना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे.या पूर्वी पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. ती पिकेही पाण्याखाली गेल्याने कुजली आहेत.
शेतकरी एक पीक घेण्यासाठी जवळपास 30 ते 40 हजार रुपये खर्च करतो. पण त्या पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून प्रति गुंठ्याला 38 रुपये म्हणजे एकरी 1520 रु. भरपाई दिली जाते. ही भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. या भागातला जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप एकदाही भेट दिली नाही. त्यामुळे अनगोळ, येळळ्tर, वडगाव, शहापूर शिवारातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.









