बेळगाव : शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत उभारण्यात येणार असून पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला-बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जागेची पाहणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत बांधण्यासाठी सरकारने 50 कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी संयुक्तपणे हिंडलगा येथे भेट देऊन जागेची पाहणी केली.
तत्पूर्वी तहसीलदार कार्यालय, उपनोंदणी कार्यालय तसेच सीएन पोलीस ठाण्याच्या इमारतींची पाहणी केली. याप्रसंगी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव शहराचा विकास होण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. सुवर्णसौध, कणबर्गी व हिंडलगा अशा तीन ठिकाणी जागांची पाहणी करण्यात आली आहे. या तीन स्थळांपैकी एखाद्या स्थळाची निवड करून इमारत बांधण्याचा विचार आहे. हिंडलगा हे बेळगाव शहराला नजीक आहे.
सध्या असलेली जिल्हाधिकाऱ्यांची इमारत जमीनदोस्त करून नवीन इमारत उभारण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जुनी ऐतिहासिक इमारत तशीच ठेवून नवीन जागेवर इमारत बांधण्याचा विचार आहे. विस्तृत जागेत इमारत उभारल्यास वाहतुकीची कोंडीही होणार नाही. त्यामुळे सुवर्णसौध, कणबर्गी आणि हिंडलगा या तिन स्थळांपैकी एखाद्या स्थळाची निवड करून इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.









