माजी आमदार अरविंद पाटील यांना जारकीहोळी बंधूंचा पाठिंबा : तालुका सहकाराच्या विकासासाठी अरविंद पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन
खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक दि. 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जात, पात, पक्ष, धर्म तसेच राजकारण विरहित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही निवडणूक लढविली जाणार आहे. खानापूर तालुक्यातून गेल्या वीस वर्षांपासून अरविंद पाटील हे डीसीसी बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आम्ही जारकीहोळी बंधू तसेच जिल्ह्यातील सहकारातील आणि राजकीय ज्येष्ठ नेतेमंडळीनी अरविंद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळीही त्यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन केएमएफ डेअरीचे चेअरमन आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पीकेपीएस संचालकांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. शुभम गार्डन येथे तालुक्यातील पीकेपीएस संस्थेच्या संचालकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुळगोडी, संचालक महांतेश दोड्डगौडर, राजेंद्र अंकलगी, पुंडलिक कारलगेकर, बाबुराव देसाई, जितेंद्र मादार, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे शाल, श्रीफळ आणि गदा भेट देऊन स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, संपूर्ण जारकीहोळी कुटुंबीय तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतेमंडळी जिल्हा बँकेची निवडणूक बँकेच्या हितासाठी वाटाघाटी करून बिनविरोध करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांना आमची जाहीर विनंती आहे. की, यावेळी त्यांनी अरविंद पाटील यांना पाठिंबा जाहीर करावा. सहकार क्षेत्रात अरविंद पाटील यांना जो अनुभव आहे. त्यासाठीच अरविंद पाटील यांना सहकार्य करावे, असे आवाहन जारकीहोळी यांनी विठ्ठल हलगेकर यांना केले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आप्पासाहेब कुलगोडी, संचालक महांतेश दोड्डगौडर, राजेंद्र अंकलगी, बाबुराव देसाई यांची अरविंद पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे झाली. मेळाव्याला तालुक्यातील 52 पीकेपीएस सोसायट्यांचे संचालक मंडळ उपस्थित होते. त्या सर्व संचालकांच्या मंडळांच्या संचालकांनी अरविंद पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. या मेळाव्यानंतर भालचंद्र जारकीहोळी यांनी प्रत्येक पीकेपीएस संचालक मंडळाशी वैयक्तिक चर्चाही केली. तसेच कोणत्याही समस्या असल्यास निवारण करू, तसेच भविष्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीकेपीएस सोसायट्यांना भरीव अनुदान मंजूर करू, असे आश्वासन संचालक मंडळाच्या सदस्यांना दिले.
विरोधक सोसायट्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे
यावेळी भालचंद्र जारकीहोळी यांनी अरविंद पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, अरविंद पाटील यांनी सर्व सोसायट्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी, कोणाचीही पत अडवू नये, अथवा सोसायट्याना आडमुठे धोरण अवलंबून नये. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याबरोबर सहकार्याने आणि समझोत्याने वागावे तसेच विरोधक सोसायट्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे सांगितले.









