विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण : प्रत्येकाने मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. 10 मे रोजी मतदान होत आहे. याची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमध्ये 4 हजार 434 मतदान केंद्रे आहेत. तर आणखी 5 अतिरिक्त मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. एकूण 4 हजार 439 मतदान केंद्रे असून जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघांमध्ये 39 लाख 67 हजार 574 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमध्ये एकूण 187 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 174 पुरुष व 13 महिला उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर 334 उमेदवारांकडून एकूण 360 अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये 25 अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. तर 47 अर्ज माघार घेण्यात आले होते. अनेक उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले होते. त्यांनीही माघार घेतल्यानंतर 187 जण आता रिंगणात आहेत. मतदानासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे 5 हजार 774 असून ती संबंधित मतदारसंघांमध्ये पाठवून देण्यात आली आहेत. अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये यंत्रे ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण 94 हजार 652 युवा मतदार आहेत. तर 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 1 लाख 95 मतदार आहेत. एकूण नव्याने 2 लाख 29 हजार 874 मतदारांची नोंद झाली आहे. त्यांना मतदानकार्ड देण्यात आले आहे. मात्र ज्यांना मतदानकार्ड मिळाले नाही त्यांना मतदारयादीमध्ये नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्यास मुभा देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी त्या व्यक्तींनी आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, भारतीय पासपोर्ट, निवृत्त वेतन कार्ड, नोकरी करत असलेले कोणत्याही प्रकारचे आयडेंटीटी कार्ड, केंद्र, राज्य, खासगी कंपन्यांमध्ये काम करत असणारे ओळखपत्र यामधील एखादे कार्ड असेल त्यांना मतदानाचा हक्क दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवार दि. 10 रोजी मतदान होणार असून त्यासाठी सर्व कर्मचारी केएसआरटीसी बसच्या माध्यमातून बुथवर दाखल होणार आहेत. एक दिवस आधीच ते मतदान केंद्रांवर दाखल होणार असून सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5 पर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यावेळेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर उपस्थित होते.
मतमोजणीचीही तयारी पूर्ण
संपूर्ण 18 मतदारसंघांची मतमोजणी आरपीडी महाविद्यालय येथे होणार आहे. शनिवार दि. 13 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रथम पोस्टल मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी केली जाणार आहे. एका मतदारसंघासाठी 11 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. जशी मतमोजणी होईल, तशी तातडीने ती जाहीर केली जाणार आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
मतदान आणि मतमोजणी दिवशी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवार दि. 8 मे पासूनच 144 कलम संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 4 हजार 803 पोलीस, 1354 होमगार्ड, कर्नाटक राखीव दलाच्या 19 तुकड्या, जिल्हा सशस्त्र दलाच्या 49 तुकड्या आणि सीएपीएफच्या 53 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली.









