बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला आणि बालविकास विभाग, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभाग, आरोग्य विभाग, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण विभाग, सहारा मद्यपान व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी दिन कार्यशाळा पार पडली. यावर्षी आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त वरील सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सहारा मद्यपान व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र बेळगाव याठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहारा ड्रग अँड अॅडिक्शन, रिहॅबिलिशन सेंटर बेळगावचे संचालक युनूस अहमद एन. गोकाक म्हणाले, अमली पदार्थांचे व्यसन सहसा एका प्रयोगाने सुरू होते.
सुरुवातीला ते अंमलीपदार्थ घेण्यास सुरुवात करतात. व्यसनीना वाटते की, हा एक वेळचा अनुभव आहे. आणि ते हाताळू शकतात. परंतु अमली पदार्थाचा वारंवार गैरवापर केल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. यामुळे माणसाचे आपल्यावरील नियंत्रण सुटते, असे ते म्हणाले. डॉ. चंद्रशेखर टी. आर. म्हणाले, अमली पदार्थांचे सेवन करणे म्हणजे हा एक आजार आहे. तो एखाद्या व्यक्तीच्या मेंदूवर आणि वर्तनावर परिणाम करतो. त्याचा परिणाम नैराश्य येण्यासह आपल्या जीवनावर अनेक विपरीत परिणाम होतात. क्लेशकारक घटना तसेच मानसिक विकारदेखील जडतो, असे ते म्हणाले. डॉ. सुधीर कामत म्हणाले, अमली पदार्थाचे सेवन ही एक जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. एकदा अमलीपदार्थ सेवन करण्याची सवय लागल्यास ती सुटणे कठीण असते, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनूस अहमद एन. गोकाक होते.









