दहा महिन्यांसाठी बसपासची मुदत : विद्यार्थ्यांची धडपड, सर्व्हरडाऊन, तांत्रिक समस्येमुळे प्रक्रिया संथगतीने
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. यंदा जून महिन्यापासून बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आतापर्यंत वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी बसपास दिला जात आहे.
मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रथमतः सेवा-सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ असल्याने बसपास उपलब्ध होण्यास उशीर होत आहे. शिवाय मागील दोन वर्षांत शैक्षणिक वर्षदेखील विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास काढणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. कोरोनाच्या आधी बेळगाव बसपास विभागातून 56 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास घ्यायचे. मात्र यंदा केवळ 20 हजार विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले आहेत. अद्यापही प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, बसपास विभागात सर्व्हरडाऊन आणि तांत्रिक समस्येमुळे बसपास प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बसपास वितरणावर याचा परिणाम होत आहे. शिवाय पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना बसपास वितरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. लवकरच सुरुवात होणार आहे.
लवकरच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बसपास प्रक्रिया
आतापर्यंत 20 हजार विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. सध्यादेखील बसपास प्रक्रिया सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बसपास मिळविले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी बसपास काढून घ्यावेत. शिवाय येत्या दिवसात पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बसपास प्रक्रिया सुरू होणार आहे.
ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर, बसपास विभाग)









