यावर्षी 10 लाख 47 हजार पुस्तकांची मागणी : टप्प्याटप्प्याने वितरण
बेळगाव : शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने शिक्षण विभागाने पाठ्यापुस्तकांच्या वितरणाला सुरुवात केली. मंगळवारपासून शहर विभागात टप्प्याटप्प्याने पुस्तकांच्या वितरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला कन्नड माध्यमाच्या पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे. त्यानंतर इतर माध्यमांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध झाली आहे. 29 मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. यावर्षी पुस्तकांच्या छपाईला विलंब झाल्यामुळे पुस्तकांचे वितरण उशिराने सुरू झाले. बेंगळूर येथे पाठ्यापुस्तकांची छपाई केली जात आहे. सध्या राज्यभरातील 60 टक्के पाठ्यापुस्तकांची छपाई पूर्ण झाली असून 55 टक्के पुस्तके बेंगळूर, म्हैसूर, बेळगाव यासह इतर विभागांना पाठविण्यात आली आहेत. बेळगाव शहर विभागामध्ये मागील आठवड्यापर्यंत केवळ 32 टक्के पुस्तकांचा साठा होता. शहरात 10 लाख 47 हजार 467 पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी मागील आठवड्यात 3 लाख 37 हजार 413 पुस्तके शिक्षण विभागाच्या गोडावूनमध्ये उपलब्ध झाली आहेत. सरकारी शाळांना मोफत पाठ्यापुस्तकांचे वितरण केले जाते तर अनुदानित व विनाअनुदानित शाळांना पुस्तकांची खरेदी करावी लागते. मंगळवारपासून चव्हाट गल्ली येथील पाठ्यापुस्तक गोडावूनमध्ये वितरणाला सुरुवात करण्यात आली. शहर गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या उपस्थितीत शहापूर, खासबाग, अनगोळ, टिळकवाडी, वडगाव, गणपत गल्ली, महांतेशनगर या विभागातील कन्नड शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पाठ्यापुस्तके सुपूर्द करण्यात आली. उर्वरित शाळांना टप्प्याटप्प्याने पाठ्यापुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.









