Distribution of Sahaja Trust’s Mental Health Awards
मानसिक आजारातून बाहेर पडणं ही एक दीर्घकाळ चालणारी लढाई आहे. त्या लढाईत संपूर्ण कुटुंबाची ताकद खर्ची पडते. ही लढाई जिद्दीने पार पडणाऱ्या व्यक्तीचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं कौतुक होणं आवश्यक आहे.तुमच्या आमच्या ओळखीच्या पण मानसिक आजारांचा सामना करत व्यावहारिक आयुष्य तितक्याच समर्थपणे जगणाऱ्या, आजारातून बरं होण्यात मोठी मजल गाठणाऱ्या व्यक्ती समाजासमोर येतील तेव्हाच याबाबतचं अज्ञान, अनास्था, गैरसमज दूर होतील.
आजाराचा सामना करणाऱ्या इतर रुग्णांना बरं होण्याची प्रेरणा मिळेल. याच उद्देशानं ऑगस्ट २०१२ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या सहज ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने यावर्षीपासून ‘विभाव : मानसिक आरोग्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. १० ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. इथून पुढे दरवर्षी आजाराचा सामना करणाऱ्या एका व्यक्तीला आणि एका नातेवाईकाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि ₹ ५,०००/- असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.यावर्षीचा शुभार्थी (मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती) पुरस्कार समीर गोसावी, मालवण आणि शुभंकर (मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीची काळजी घेणारी व्यक्ती) पुरस्कार गौरी सावळ, बांदा यांना प्राप्त झाला.
सावंतवाडी / प्रतिनिधी