विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ : शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा
प्रतिनिधी/ बेळगाव
शालेय विद्यार्थ्यांना सध्या शहरात कच्ची केळी वितरित केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. मागील आठ दिवसांपासून कच्ची केळी दिली जात असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे विद्यार्थी आजारी पडत असून शिक्षण विभागाने कच्ची केळी वितरण करणे थांबवावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमधील कुपोषण थांबविण्यासाठी सरकारी शाळांमध्ये अंडी व केळी वितरण केले जात आहे. मध्यंतरी शेंगा, चिक्की देखील वितरित केली जात होती. परंतु काही ठिकाणी मुदत संपलेली चिक्की वितरित केली जात असल्याचे समोर येताच सरकारने वितरण बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना अंडी व अंडी न खाणाऱ्यांना केळी वितरण केले जात आहे. बेळगाव शहरातही कंत्राटदारांकडून केळी वितरण केले जाते.
अंड्यांपेक्षा केळींना विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळत आहे. परंतु मागील आठवडाभरापासून कच्ची केळी वितरित केली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालकांनी शाळांमध्ये जाऊन याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली आहे. यापुढे कच्ची केळी वितरित केल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. कच्ची केळी सेवन केल्याने विद्यार्थी आजारी पडत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. केळी द्यायची असतील तर ती चांगल्या दर्जाची व पिकलेली द्यावीत, अशीही मागणी होत आहे.
सरकारी शाळांमध्ये कच्ची केळी वितरित केली जात असल्याची तक्रार आली होती. त्यामुळे शहरातील एका शाळेत जाऊन केळी तपासणी केली. यावेळी कच्ची केळी वितरित केली जात असल्याचे निदर्शनास आले. पिकलेली केळी उपलब्ध होत नसल्याचे सांगून केमिकलमध्ये बुडविलेली केळी वितरित केली जात असल्याने याची तक्रार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी सांगितले.









