प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ाच्या दिवसात जीव धोक्यात घालून पॉवरमन सेवा बजावत असतात. या कर्मचाऱयांना पावसापासून संरक्षणासाठी लक्ष्मीताई फौंडेशनच्यावतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. मंगळवारी सुळगा (हिंडलगा) येथे झालेल्या कार्यक्रमात विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते विद्युत कर्मचाऱयांना रेनकोट देण्यात आले.
जोरदार वारा-पावसामुळे अनेक वेळा विद्युत समस्या जाणवते. वीज ही प्रत्येकाची गरज बनल्यामुळे अशा वेळी पॉवरमन आपला जीव धोक्मयात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा कर्मचाऱयांना रेनकोट व इतर साहित्य देणे आपली जबाबदारी असल्याचे हट्टीहोळी यांनी सांगितले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या लक्ष्मीताई फौंडेशनतर्फे पिरनवाडी, उचगाव, हिंडलगा व बेळगाव ग्रामीण विभागातील विद्युत कर्मचाऱयांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, ग्रा. पं. अध्यक्ष रघुनाथ खांडेकर, बसवणगौडा पाटील, सिद्दनगौडा पाटील, अशोक कांबळे, विठ्ठल देसाई, गजानन काकतकर, जयंत बाळेकुंद्री, सुधीर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.