प्रतिनिधी /बेळगाव
नार्वेकर गल्ली शहापूर येथील जोतिबा देवस्थानमध्ये रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठय़ा उत्साहाने घेतला. चैत्र पौर्णिमेनिमित्त या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरामध्ये सकाळी 9 वाजता मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली. त्यानंतर पिंपळकट्टा होसूर जवळील मारुती मंदिरामध्ये सासनकाठीचे पूजन करण्यात आले. याचबरोबर मारुतीच्या मूर्तीला अभिषेक देखील घालण्यात आला.
मारुती मंदिरामध्ये अभिषेक झाल्यानंतर झुणका भाकरी व अंबिल-घुगऱया यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरामध्ये भाविक दाखल झाले. त्याठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी सासनकाठीची मिरवणूक काढण्यात आली. होसूर बसवाण गल्ली शहापूर, पी. बी. रोड, गाडेमार्ग यासह इतर परिसरात सासनकाठी मिरवणूक काढण्यात आली. जोतिबा मंदिरात कार्यक्रमाची सांगता झाली.









