वार्ताहर/उचगाव
ग्रामीण भागाचा अधिकाधिक विकास साधण्यासाठी आणि जनतेला अधिकाधिक सुविधा कशा मिळतील यासाठी मी सदोदित प्रयत्नशील राहीन. राजकारण नाही तर विकास, अभिवृद्धी यावर सदोदित माझा भर असेल, असे मनोगत कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. उचगाव गणपत गल्ली येथील शिवज्योत युवक मंडळाच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त रविवारी दुपारी गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. याच्या शुभारंभप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून विनायक चौगुले उपस्थित होते. याप्रसंगी दीपा तानाजी पावशे आणि निता तुपारे यांच्या हस्ते लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला वर्गांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्यात आला.









