सामाजिक संस्थांचा पुढाकार
बेळगाव : राईट्स सीएसआर लिमिटेड, आश्रय फाऊंडेशन, बिम्समधील एआरटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीबाधित विधवांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने गटवार चर्चा घडविण्यात आली. आयएमए हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाचे जिल्हा एड्स नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी देवडी यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी अॅड. लक्ष्मण तपसी होते. यावेळी डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. गिरीधर पाटील आदींनीही मार्गदर्शन केले. 2006 पासून एआरटी सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून औषधे पुरविली जात आहेत, अशी माहिती देण्यात आली. एचआयव्हीबाधितांनी वेळेत औषधे घ्यावीत, त्यांच्यासाठी रक्ततपासणी, एक्स-रे, स्कॅनिंग, एमआरआय आदी सेवा मोफत आहेत. त्यांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गिरीधर पाटील यांनी केले. यावेळी डॉ. विनोद बावडेकर, अॅड. लता दोडमनी यांनीही मार्गदर्शन केले. आश्रय फाऊंडेशनच्या संस्थापिका नागरत्ना रामगौडा यांचेही मार्गदर्शन लाभले. 67 हून अधिक एचआयव्हीबाधित या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांना पौष्टिक आहार आणि प्रोटिन पावडर वितरित करण्यात आली. यावेळी अर्चना पद्मण्णावर, उमेश द•ाrमनी, अॅड. रूपाली कुन्हे, संजीव, किरण, सपना आदी उपस्थित होते.









