वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 70,000 नोकरी पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. येथे आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांनी या नोकरीपत्रांचे वितरण मंगळवारी केले. ते या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समाविष्ट झाले. त्यांनी नवीन नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषणही केले.
या नव्या नोकऱ्या शालेय शिक्षण, वित्तसेवा, पोस्ट, उच्च शिक्षण, संरक्षण, महसूल, आरोग्य आणि कुटुंबकल्याण, अणुऊर्जा विभाग, रेल्वे, लेखा आणि लेखातपासणी, तसेच गृह या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये देण्यात आल्या आहेत. इतरही काही विभागांमधींल रिक्त पदे या मेळाव्यात भरण्यात आली आहेत.
रोजगारनिर्मितीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणानुसार रोजगार मेळाव्यांचे आयोजन विविध स्थानी करण्यात येत आहे. या मालिकेतील हा चौथा रोजगार मेळावा होता. विविध केंद्र सरकारी विभागांमध्ये 10 लाख रिक्त पदे असून ती भरण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही सर्व पदे भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळावा कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता.









