खानापूर : ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे तसेच चांगले विद्यार्थी घडावेत, यासाठी बेळगाव लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील 36 शाळांना दत्तक घेऊन शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तथा लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून तसेच लोककल्पच्या प्रमुख मालिनी बाली यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशन ही संस्था विविध उपक्रम राबवत आहे. हे कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य मलप्रभा हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी लोककल्पच्यावतीने चापगाव येथील शाळांना ग्रीन बोर्ड प्रदान करताना व्यक्त केले.
यावेळी मराठी मुलांची शाळा तसेच कन्नड शाळेचे पालक, एसडीएमसी सदस्य, शिक्षक वर्ग उपस्थित हेते. चापगाव येथील मराठी मुलांची शाळा तसेच कन्नड प्राथमिक आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल या तिन्ही शाळांना लोककल्पच्यावतीने ग्रीन बोर्ड देण्यात आले. यावेळी लोककल्प फाऊंडेशनचे सुरजसिंग रजपूत आणि संतोष कदम यांनी मंगळवारी चापगाव येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 4, कन्नड प्राथमिक शाळेला एक, मलप्रभा हायस्कूलसाठी एक ग्रीन बोर्ड वितरण करण्यात आले.
मलप्रभा हायस्कूल
मलप्रभा हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे तसेच मराठी शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे होते. यावेळी व्यासपीठावर लोककल्पचे संयोजक संतोष कदम, तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी विवेक गिरी, चापगाव ग्रा. पं. सदस्य मारुती चोपडे, ग्रा. पं. सदस्य नजीर सनदी, एसडीएमसीच्या उपाध्यक्षा नम्रता नारायण पाटील, तालुका रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी, निवृत्त सैनिक संजय बेळगावकर, एसडीएमसी महादेव पाटील, यल्लाप्पा पाटील, गजानन पाटील, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मादीगार आदी उपस्थित होते. मराठी प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक महेश कवठणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन फोटोपूजन झाले व फीत कापून ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले.









