उद्योजिका रेवती कामत यांच्याकडून मोफत वितरण
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी नजीकच्या विजयनगर-गवळीवाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती. याची माहिती बेंगळूर येथील उद्योजिका रेवती कामत यांना मिळताच त्यांनी विजयनगर-गवळीवाडा येथील इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकूण 23 सायकली देणगीदाखल दिल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट दूर झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. विजयनगर-गवळीवाडा येथील सुमारे 25 ते 30 विद्यार्थी नियमितपणे जांबोटी येथे शिक्षणासाठी जातात. त्यांना बसची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जांबोटीपर्यंतचे दोन-दीड किलोमीटर अंतर पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते.
बेंगळूर येथील उद्योजिका रेवती कामत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून विजयनगर-गवळीवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी एकूण दीड लाख रु. किमतीच्या 23 सायकली देणगीदाखल दिल्या. सदर सायकली विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी भीम आर्मीचे जिल्हा सचिव नागेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गट शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, भाजपा महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा धनश्री सरदेसाई, पत्रकार प्रसन्ना कुंभार, मैलाद पट्टाद, भीम आर्मी जिल्हा सचिव नागेश कांबळे, केएमएफचे माजी संचालक संतोष पाटील, मुख्याध्यापक महेश सडेकर, जांबोटी सीआरसी विठोबा दळवी, मुख्याध्यापक रमेश गावडे, शिक्षक उदय अथणी, राजू कुर्लेकर, राजू तळवार आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सायकली मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल प्रसन्ना कुंभार, मैलार पट्टाद, नागेश कांबळे यांचा विजयनगर-गवळीवाडा नागरिकांतर्फे सत्कार केला.









