मजुरांनी कामाबरोबर आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी : हत्तरगुंजी येथे तलाव खोदाईचा शुभारंभ
खानापूर : नरेगा योजनेंतर्गत मजुरांनी काम करत असताना आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, सध्या उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे वातावरणाचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. यासाठी मजुरानी काम करत असताना वेळोवेळी पाणी पिऊन आपल्या शरीरातील पाणी पातळी योग्य राखावी, असे आवाहन नरेगाच्या तालुका उपसंचालिका रुपाली बडकुंद्री यांनी हत्तरगुंजी येथे तलाव खोदाई कामाच्या ठिकाणी नरेगा मजुरांना प्रथमोपचार संचासह इतर साहित्याच्या वितरणप्रसंगी बोलताना व्यक्त केले. हलकर्णी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रातील हत्तरगुंजी येथे तलावाच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी मजुरांना शासनाकडून प्रथमोपचार संच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, पाण्याच्या बॉटल यासह इतर साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शासनाकडून वातावरणातील वाढलेल्या उष्णतेमुळे नरेगा मजुरांना 30 टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून तसेच दिव्यांग मजुरांना 50 टक्के सूट देण्यात येत आहे. मजुरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाचे नियोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सर्व मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे. ज्यांना अद्याप जॉबकार्ड मिळालेले नाही. त्यांनी प्रमुखांशी संपर्क साधून जॉबकार्ड मिळवावे आणि शासनाच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश अल्लाबादी यांनी केले. यावेळी हलकर्णी ग्रा. पं. च्या अध्यक्षा जीजा अल्लोळकर, सदस्य प्रवीण अगणोजी, ग्रा. पं. सेक्रेटरी निकालास सोज, साताप्पा इरगार, महांतेश जटंगी, महादेव होसूरकर, श्रीधर सनदी यासह मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









