आरोग्यासाठी विशेष अभियान : कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
बेळगाव : रोहयोंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या अंतर्गत रोहयो कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार कीट आणि पाण्याच्या बॉटल वितरित करण्यात आल्या आहेत. धामणे एस., येळ्ळूर, बस्तवाड आदी ठिकाणी कीटचे वाटप करण्यात आले. जि. पं. योजना संचालक रवी बंगारेप्पण्णवर व ता. पं. कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहयोंना कीटचे वाटप झाले. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे. या अंतर्गत एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. विविध ग्रा. पं. कार्यक्षेत्रांमध्ये रोहयोअंतर्गत तलाव, नाले, रस्ते आणि इतर कामांना चालना देण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
यासाठी कामगारांना कामावरच उपचार करता यावेत यासाठी प्रथमोपचार कीटचे वाटप करण्यात आले आहे. त्याबरोबरच कामगारांची तहान भागावी यासाठी 20 लिटर क्षमतेची पाण्याची बॉटल वितरित करण्यात आली आहे. शिवाय रोहयोमध्ये आता दिव्यांगांचाही सहभाग राहणार आहे. दिव्यांगांना जॉबकार्ड वितरणाची मोहीमही राबविण्यात आली आहे. विशेषत: रोजगार हमी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. यासाठी विशेष अभियान राबवून आरोग्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय प्रथमोपचार कीट आणि पाण्याची बॉटलही दिली जात आहे. वाढत्या उन्हात तहान भागविण्यासाठी पाण्याची गरज भासू लागली आहे. यासाठी कामाच्या ठिकाणी 20 लिटर क्षमतेची पाण्याची बॉटल वितरित केली जात आहे.









