बेळगाव : घटप्रभा नदीमध्ये मासेमारी करताना बुडून मृत्यू झालेल्या लक्ष्मण अंबली यांच्या बेनकनहोळी (ता. हुक्केरी) येथील निवासस्थानाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवार दि. 20 रोजी भेट दिली. लक्ष्मण अंबली यांच्या पत्नीचे सांत्वन करून आर्थिक मदतीच्या आदेशपत्राचे वितरण केले. मत्स्योद्योग आपत्ती निधी अंतर्गत 8 लाख रुपयांच्या मदतीच्या आदेशपत्राचे वितरण झाले. घटप्रभा नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या लक्ष्मण व त्यांच्या दोन मुलांच्या नदीच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला होता. दोन दिवसापूर्वी ही घटना घडली होती. आर्थिक मदतीच्या आदेशपत्राचे वितरण करून पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले की, लक्ष्मण अंबली यांच्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने शिक्षण खात्यामार्फत प्रत्येकी 1.25 लाख रुपये व केंद्र सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत तसेच निवासी योजनेंतर्गत घर मंजूर करून देऊ. तसेच लक्ष्मण अंबली यांच्या पत्नी लक्ष्मी यांना विधवा पेन्शनच्या आदेशपत्राचे व राष्ट्रीय कुटुंब मदत योजनेंतर्गत 20 हजारांची मदतही दिली. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, बेळगाव महानगर विकास प्राधिकरणचे (बुडा) अध्यक्ष लक्ष्मण चिंगळी, तहसीलदार मंजुळा नायक, हुक्केरी ता. पं. चे कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, मत्स्योद्योग खात्याचे सहसंचालक संतोष कोप्पद, गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील, हुक्केरी मंडल पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, महसूल निरीक्षक चंद्रकांत कलखांबकर, बेनकनहोळी ग्रा. पं. चे अध्यक्ष बसवराज धरनट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
Previous Articleबेळगावहून नेलेल्या यकृताचे बेंगळूरमध्ये रोपण
Next Article कॅन्टोन्मेंट हस्तांतरणासाठी डिसेंबरमध्ये बैठक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









