शिक्षण विभागाचा महसूल खात्याकडे प्रस्ताव
बेळगाव : शाळकरी मुलांना अंडी देण्याची योजना यशस्वी ठरत असल्याने आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अंडी व केळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाच्या अंतिम परवानगीची वाट पाहिली जात असून, त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून हा नवा निर्णय लागू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्नघटक मिळावेत यासाठी मध्यान्ह आहारासोबत अंडी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंड्यांचे वितरण सुरू करण्यात आले. परंतु अनेक विद्यार्थी अंडी खात नसल्यामुळे त्यांना शेंगदाणा चिक्की किंवा केळे वितरण करण्यात येत आहे. राज्यात मागील 5 ते 6 महिन्यांपासून अंडी वितरण सुरू आहे. आता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही अंडी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्यातून दोन वेळा अंडी वितरण करण्यात येणार आहे. यासाठी 300 कोटी ऊपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी या प्रस्तावाला तोंडी मंजुरी दिली असून, महसूल खात्याने परवानगी दिल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून अंडी वितरण केली जाणार आहेत.
अंड्यांना प्राधान्य
अंडी वितरण करण्यापूर्वी सार्वजनिक शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. 47.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 38.37 लाख विद्यार्थ्यांनी अंड्यांना प्राधान्य दिले तर उर्वरित 3.37 लाख विद्यार्थ्यांनी केळी तर 2.27 लाख विद्यार्थ्यांनी शेंगदाणा चिक्कीला प्राधान्य दिले. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून अंडी वितरण केले जाण्याची शक्यता आहे.









