महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा उपक्रम
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. मराठी भाषा, संस्कृती, शाळा टिकवण्यासाठी मराठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. खानापूर तालुक्यातील आतापर्यंत दिडशे शाळांतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी दिली. त्याचाच एक भाग म्हणून युवा समितीच्यावतीने खानापूर शहरासह परिसरातील तसेच नंदगड, हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, सागरे, नंजिनकोंडल, कणकुंबी, जांबोटी, बैलूर परिसरातील गावातील शाळांमधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नंदगड येथील संत मेलगे सरकारी मराठी शाळा व जेसीएस सरकारी मराठी शाळात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापिका मीना उत्तूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुंडलिक कारलगेकर यांनी आतापर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्याथ्यानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याला युवा समितीची साथ मिळत असल्याची माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच कणकुंबी-जांबोटी भागातील 40 शाळामध्ये शालेय साहित्याचे वितरण केले आहे. येत्या काही दिवसात खानापूर शहराच्या आसपासच्या शाळांमधून साहित्याचे वाटप करणार असल्याचे सांगितले. युवा समितीच्या या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून यावषी बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्मयातील जवळपास दोनशे शाळा आणि पाच हजार विद्यार्थ्यांना या साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूर तालुक्मयातील 120 शाळांमध्ये हे वितरण होत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी युवा समिती प्रयत्नशील असते. हा उपक्रम राबविण्यासाठी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संतोष कृष्णाचे, प्रवीण रेडेकर, राजू कदम, विनायक कावळे, सिद्धार्थ चौगुले, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी हे विशेष परिश्रम घेत आहेत.









