वार्ताहर /कणकुंबी
वडगाव-जांबोटी येथील सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळेला विविध संघ संस्थांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. जांबोटी केंद्रातील वडगाव येथील प्राथमिक मराठी शाळेला बेळगावच्या ऑपरेशन मदत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे कार्यकर्ते राहुल पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी व खेळाविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए. सी. देवगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच वडगावचे सुपुत्र शिक्षक प्रल्हाद गुंडू दळवी यांनी विद्यार्थ्यांसाठी टाय, बेल्ट व ओळखपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच बेळगावच्या लोककल्प फाउंडेशन संस्थेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांना हिवाळ्dयापासून आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वेटर देण्यात आले. याप्रसंगी लोककल्प फौंडेशनचे कार्यकर्ते संतोष कदम, जांबोटी ग्रा. पं. उपाध्यक्ष सुनील देसाई, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश देसाई, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती ए. सी. देवगेकर यांनी लोककल्प फाउंडेशन, ऑपरेशन मदत व शिक्षक प्रल्हाद दळवी या सर्वांचे आभार मानले.
पारवाड शाळेला लोककल्पतर्फे खेळाचे साहित्य भेट
लोककल्प फौंडेशनच्यावतीने संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी कणकुंबी भागातील जवळपास 32 गावे दत्तक घेतली आहेत. कणकुंबी-चोर्ला भागातील प्रत्येक गावातील शाळांना क्रीडा साहित्याचे वितरण किंवा शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.तसेच पारवाड येथील प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य दिले आहे. यावेळी लोककल्प फाऊंडेशनचे कार्यकर्ते संतोष कदम, मुख्याध्यापिका श्रीमती कारेकर, श्रीमत शारदा हंगिरकर तसेच शिक्षक मुरगोड, भोवी उपस्थित होते.









