वार्ताहर /पणजी
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार संचालनालय अधिकाऱयांनी तिसवाडी तालुक्यातील अत्यंत गरीब सहा कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वितरण केले. यावेळी अधिकाऱयांनी तिसवाडी तालुका रॉकेलमुक्त झाल्याची घोषणा केली आहे.
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार संचालनालय गॅस सिलिंडर वापरत नसलेल्या तिसवाडी तालुक्यातील 95 कुटुंबाना रॉकेलचा साठा वितरित करीत होते. नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांनी अचानक रॉकेलचा साठा घेणाऱया ग्राहकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर 89 कुटुंबे गॅस वापरत असल्याचे समोर आले व 6 कुटुंबे रॉकेल वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदर 89 कुटुंबांचा रॉकेलपुरवठा बंद करण्यात आला असून सहा कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर पुरविण्यात आले. यावेळी अधिकाऱयांनी तिसवाडी तालुका रॉकेलमुक्त झाल्याची घोषणा केली.
नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक दर्शन बा. हरमलकर, उपनिरीक्षक सगुण धारगळकर, उपनिरीक्षक निधी मडकईकर तसेच कविश गॅस सर्विसचे प्रबंधक सिद्धार्थ चोडणकर यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. रॉकेल मुक्त गावाची घोषणा झाल्यानंतर तिसवाडी तालुक्यातील नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी तात्काळ पावले उचलून तिसवाडी तालुका रॉकेलमुक्त केल्याबद्दल नागरिकांनी कर्मचारी वर्ग तसेच भारत पेट्रोलियम अधिकाऱयांचे कौतुक करून अभार मानले आहेत.
गोव्यात बऱयाच ठिकाणी परराज्यातील कुटुंबे भाडेकरू म्हणून रहातात. परंतु त्यांच्याकडे गॅस सिलिंडर नसल्यामुळे बरेचजण रॉकेलचा वापर करताना दिसतात. राज्यात रॉकेल पुरवठा हळूहळू बंद होत असल्याने अशा कुटुंबांसमोर अडचण निर्माण झाली आहे तर रॉकेल पुरवठाधारक अशा लोकांना दुप्पट पैसे आकारून रॉकेल विकतात. त्यामुळे अशा लोकांनी खुल्या बाजारातून मिनी गॅस सिलिंडरचा वापर करावा, असे अधिकाऱयांनी सांगितले.









