युवा आघाडीचे शुभम शेळके यांचे मनपाला निवेदन
बेळगाव : बॅ.नाथ पै चौक ते खासबाग येथील बसवेश्वर चौकादरम्यान भाजी विक्रेत्यांसाठी गाळे उभारण्यात आले आहेत. गाळयांच्या उभारणीचे काम पुर्ण झाले तरी अद्याप वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे गाळ्यांचे वितरण पारदर्शीपणे करण्यात यावे. तसेच मनपा कार्यालयासमोर भगव्या झेंड्याला स्थान देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन युवा आघाडीचे शुभम शेळके यांनी उपमहापौर रेश्मा पाटील यांना बुधवारी दिले. खासबाग परिसरात दर रविवारी मोठ्याप्रमाणात बाजार भरतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसाठी गाळयांची उभारणी करण्यात आली आहे. पण अद्याप वितरण करण्यात आले नाही. खाऊ कट्ट्यातील गाळयांच्या वितरणाची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध झाली नाही. त्यामुळे खासबाग परिसरातील गाळयाचे वितरण पारदर्शीपणे करण्यात यावे, अशी मागणी शुभम शेळके यांनी महापौर-उपमहापौरांकडे केली आहे. तसेच भगवा ध्वज लावण्यासाठी महापालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार स्वामी विवेकानंद रोडवरील जुन्या मनपा कार्यालयासमोर भगवा ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. पण शासनाने मनपाची नवी इमारत बनवून कार्यालयाचे कामकाज स्थलांतर केले आहे. पण मनपाच्या दप्तरात ठराव तसाच आहे. मात्र नव्या इमारतीसमोर भगवा लावण्याकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. वाद टाळण्यासाठी मराठी भाषिक व नगरसेवकांनी तिरंगा लावण्यावर समाधान मानले. पण मुख्य कार्यालयासमोर लाल-पिवळा ध्वज लावण्यात आला आहे. त्यामुळे मनपा कार्यालयात भगवा लावण्यात यावा, अन्यथा लाल-पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी शुभम शेळके यांनी केली आहे.









