बेळगाव वन, ग्राम वन कार्यालयात ऑनलाईन सेवा उपलब्ध
बेळगाव : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण केले जाणार आहे. यासाठी बेळगाव वन आणि ग्राम वन कार्यालयात ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांनी जवळच्या ऑनलाईन सेंटरमध्ये अर्ज करून बसपास मिळवावेत, असे आवाहन परिवहनने केले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे बसपास वितरणचे काम विस्कळीत झाले होते. शाळा-कॉलेज कधी ऑगस्ट तर कधी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली होती. त्यामुळे बसपास सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आले होते. मात्र, यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जाणार आहेत. यासाठी सर्व तयारी मंडळाच्या बसपास विभागात सुरू झाली आहे. बेळगाव विभागातील तीन आगारांसह खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती अशा एकूण सात विभागात तब्बल 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बसपास घेतात. मात्र, मागील दोन वर्षात बसपासच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. यंदा पूर्ववतपणे बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. शिवाय बसपास वितरणाची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेंटरवर प्रथमत: अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर बसपास तेथूनच वितरित होणार आहेत. दोन वर्षांपूर्वी बसपास प्रक्रिया ऑफलाईन चालत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करताच तातडीने त्यांच्या हाती बसपास दिला जात होता. मात्र, आता ही प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर काही दिवसात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, सर्व्हर डाऊनसह तांत्रिक अडचणींमुळे या कामात अडथळा येत आहे. यंदा बेळगाव वन आणि ग्राम वन कार्यालयात बसपास वितरण प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही गावातील ग्राम वन कार्यालयात बसपास उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळणार
यंदापासून बसपास प्रक्रिया बेळगाव वन व ग्राम वनमध्ये चालणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून बसपास उपलब्ध करून घ्यावेत. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच बसपास प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बसपास दिले जाणार आहेत, असे डेपो मॅनेजर ए. वाय. शिरगुप्पीकर यांनी सांगितले.









