सेवा सिंधू पोर्टलवरून विनाशुल्क अर्ज करता येणार : विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे परिवहन मंडळाचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक परिवहन मंडळाच्यावतीने शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 1 जूनपासून 2025-26 सालासाठी सवलतीच्या दरात बसपास वितरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सेवासिंधू पोर्टलवरून अर्ज दाखल करावा लागणार असून यासाठी सरकारकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर कर्नाटक वन, ग्राम वन आणि बेंगळूर केंद्राद्वारेही विद्यार्थ्यांना बसपाससाठी अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र, यासाठी 30 ऊपयांपर्यंतचे सेवाशुल्क आकारण्यात येणार असल्याचे परिवहन मंडळाने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. विद्यार्थी सेवा सिंधू पोर्टल किंवा परिवहन मंडळाच्या वेबसाईटवरून बसपाससाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक घोषणापत्र डाऊनलोड करू शकतात. यासाठी अर्ज करताना सोईस्कर पास काऊंटर निवडावा आणि तो सादर करावा, असेही परिवहन मंडळाने म्हटले आहे. अर्ज केल्यानंतर बसपास घेण्यासाठी कोणत्या काऊंटरवर जावे, असा एसएमएस मोबाईलवर पाठविला जाणार आहे. बसपाससाठी विद्यार्थ्यांना नगद, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआयमार्फत शुल्क भरता येऊ शकते.
अर्ज कसा करावा…
विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलवरून बसपाससाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी परिवहन मंडळाने https://sevasindhu. karnataka.gov.in ही वेबसाईट जारी केली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. शिवाय विद्यार्थी कर्नाटक वन, ग्राम वन केंद्रांना भेट देऊ शकतात. या केंद्रांवर सदर केंद्राच्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांकडून केवळ 30 ऊपये सेवाशुल्क वसूलची परवानगी दिली आहे. राज्यात राहणाऱ्या आणि शेजारील राज्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शेजारील राज्यांमध्ये राहणाऱ्या आणि कर्नाटक राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सेवा सिंधू पोर्टलद्वारे अर्ज करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी बसपास शुल्क भरल्यानंतर कर्नाटक वन आणि ग्राम वन केंद्रांवर ऑनलाईन अर्जाच्या सादर प्रतिसह पास काऊंटरवरून पास मिळविता येणार आहे.
येथे मिळणार बसपास…
बेळगाव विभागातील विद्यार्थ्यांना अशोकनगर येथील बेळगाव वन, गोवावेस येथील बेळगाव वन, टीव्ही सेंटरनजीकच्या बुद्धा कॉम्प्लेक्स येथील बेळगाव वन, बैलहोंगल येथील कौजलगी चाळीतील कर्नाटक वन, खानापूर रोडवरील शेट्टी कॉम्प्लेक्समधील कर्नाटक वनमध्ये बसपास काऊंटर सेवा प्रदान करण्यात आली आहे.










